खाजगी जमिनीत उभारलेले “ते” धर्मस्थळ अखेर रातोरात हटवले

कणकवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावातील घटना
“ते” धर्मस्थळ हटवण्यासाठी हिंदू धर्मीय एकवटले, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ची देखील साथ
कणकवली तालुक्यातून देवगड तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या एका मुख्य रस्त्यालगत असलेल्या कणकवली तालुक्यातील एका गावात एका अन्य धर्मियांकडून खाजगी जमिनीत बांधल्या गेलेल्या धार्मिक स्थळावर अखेर काल गुरुवारी रात्री हातोडा चालवला गेला. ग्रामस्थांनी एकत्र येत याबाबत मंदिरात बैठक घेत निर्णय घेतला व त्यानंतर रात्री “जय श्रीराम”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव च्या घोषणा देत तात्पुरत्या स्वरूपात गेल्या काही वर्षात उभारले गेलेले “ते” धार्मिक स्थळ अखेर हटवण्यात आले. व या ठिकाणी भगवा झेंडा फडकवण्यात आला. ग्रामस्थांसोबत या संपूर्ण घटनेत बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. गेले काही महिने हा विषय गावामध्ये चर्चेत होता. यापूर्वी त्या गावच्या ग्रामसभेत देखील याची चर्चा झाल्याचे समजते. या ठिकाणी त्या धर्मीयां मधील काहींना दृष्टांत झाला व त्यातून या धर्मस्थळाची निर्मिती झाल्याचे ही बोलले जाते. याबाबत सुरू असलेल्या चर्चेनुसार या कथित दृष्टांतात त्यांच्या धर्मियांमधील ते सहा जण सिंधुदुर्गात आले व तेथून चार जणांचा येथे मृत्यू झाला तर दोघेजण रत्नागिरी मध्ये गेले व या चारांमधील हे या गावांमध्ये या जागी आल्याचे दृष्टांतात दिसले. व त्यानंतर या ठिकाणी या धार्मिक स्थळाची निर्मितीची सुरुवात झाली. मात्र ते अनधिकृत असलेले धार्मिक स्थळ हटवल्यानंतर याबाबत कणकवली पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती. परंतु त्या समाजाचे काही जण पोलीस स्टेशनला गेल्याचे समजते. खबरदारीच्या उपयोजना म्हणून कणकवली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कणकवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या व गावच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्या गावातील वाडीमध्ये एका अन्य धर्मीयांचे धर्मस्थळ सुरू केले गेले होते. गेल्या दोन-तीन वर्षांमध्येच याची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी केली होती. परंतु हे धर्मस्थळ ज्या जमीन मालकांच्या जमिनीत होते त्यांच्याकडून मात्र या सर्वांना परवानगी घेतलेली नव्हती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याबाबतची दबक्या आवाजात कजबुज देखील सुरू होती. मात्र या संपूर्ण घटनेला वाचा फुटत नव्हती. अखेर नुकतीच याबाबत एक बैठक गावच्या मंदिरामध्ये घेण्यात आली. व त्यानंतर संपूर्ण गावाने एकमताने गावामध्ये नव्याने निर्माण केलेले हे अन्य धर्मीयांचे धर्मस्थळ तेथून हटवण्याचा निर्णय घेतला. व एकत्र येत रात्रीत हे सर्व हटवून या ठिकाणी हिंदू धर्मियांच्या खुणा ठेवण्यात आल्या. हे हटवलेले धर्मस्थळ कोणी निर्माण केले?, त्यामागे कोण होते?, ही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता का?, यासह असे अन्य अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे खाजगी जमिनीमध्ये उभारलेले अन्य धर्मीयांचे धर्मस्थळ ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत हटवण्याची बहुदा ही पहिलीच घटना असल्याने या घटनेची चर्चा कणकवली तालुक्यात सुरू आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली