इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.

मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराचे सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव धाप लागणे, न्यूमोनिया आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३.०३.२०२३ अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील शहरी भागात दिसून येत आहे. या आजाराचे लक्षणे तसेच उपचार पध्दती या बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांना आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येतात. तसेच आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!