व्यापारी संघ कणकवलीचा ‘प्रज्ञानी’ उपक्रम

स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन
इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रभावी प्रशिक्षण मिळावे, यासाठी कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे ‘प्रज्ञानी’ या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भा. ता. चव्हाण म. मा. विद्यालय, चौके येथील माजी विद्यार्थी महामेळावा मंचाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. अशा वेळी संकल्पनांचे सखोल आकलन, अचूकता व शीघ्रगतीने उत्तर देण्याची क्षमता विकसित होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘प्रज्ञानी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रज्ञाविकासाला चालना देत ज्ञानार्जन व ज्ञानवापर कौशल्ये अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अभ्यासक्रमातील संकल्पनांचा नेमका व वेगवान वापर करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज ओळखून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी मुंबई येथील प्रतिथयश गणिततज्ज्ञ प्रा. संजय मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गणित व सांख्यिकी विषयातील गुंतागुंतीच्या संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे ते विशेष परिचित आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन लाभदायी ठरणार आहे.
शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय, कणकवली नं. ३ येथे कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. इयत्ता चौथी व सातवीतील सर्व प्रशालांमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपकजी बेलवलकर, जिल्हा परिषद शाळेचे केंद्रसंचालक संजयजी पवार तसेच उपक्रमाचे प्रणेते मा. प्रविणजी शेवडे (कट्टा) यांनी केले आहे.
सकाळी ११ वाजता फक्त इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन सत्र आयोजित करण्यात आले असून संबंधित विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दीपक बेलवलकर, केंद्रसंचालक संजय पवार, प्रणेते प्रविण शेवडे व ता.भा.चव्हाण म. मा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी आदींनी केले आहे.





