टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता एक अभिनव उपक्रम

टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटने (MVS) तर्फे दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “स्पर्श- एक एहसास” हे, चांगला आणि वाईट स्पर्श यासंबंधी एक व्याख्यान आयोजित करण्यात आले. इनर व्हील्स संस्थेच्या अंबरनाथ शाखेच्या माजी अध्यक्षा आणि या विषयातील प्रशिक्षित तज्ञ श्रीमती स्नेहल केळुसकर यांनी दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करून १ ली ते ४ थी च्या मुलांना अतिशय सोप्या आणि सोज्वळ भाषेत या विषयाची माहिती दिली. यावेळी झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये मुलांनाही सहभागी करून घेण्यात आले. साधारण २५० विद्यार्थी आणि काही पालक तसेच सर्व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. MVS चे अध्यक्ष श्री. रघुनाथ शेवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची माहिती दिली. श्री. राजन तेंडोलकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिल्यानंतर प्रथम पहिली व दुसरी आणि नंतर तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता दोन वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन केले गेले. शेवटी मुख्याध्यापिका श्रीमती गोसावी यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MVS च्या सभासद डॉ. दया कोयंडे यांच्या पुढाकाराने, १९७७ HSC बॅचच्या सहकार्याने आणि मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. विजय कामत व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोसावी यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम संपन्न झाला. काळाची गरज असलेला या नाजूक व संवेदनशील विषयाला हात घालून त्यासंबंधी इतका चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पालक आणि शिक्षकांनी MVS चे कौतुक केले.

error: Content is protected !!