डेगवे-डिंगणे कोतवालाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघे निर्दोष

आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे- डिंगणे येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डिंगणे येथील चंद्रकांत गणपत सावंत, नितीन श्रीधर सावंत व प्रदीप गणपत सावंत यांची सहाय्यक सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

१४ डिसेंबर २०२० रोजी रोजी रात्री कोतवाल संतोष नाईक यांनी घरी गवतावर फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली होती. याबाबत त्यांची मुलगी ऐश्वर्या हीने बांदा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गावातील चंद्रकांत, नितीन व प्रदीप सावंत यांच्यात जमिनीत झालेल्या खोदकामाबाबत बांदा मंडळ निरीक्षक राजेसाहेब राणे यांच्याकडे आपल्या वडिलांनीच तक्रार केल्याचा समज करून घेऊन १४ डिसेंबर रोजी चंद्रकांत सावंत याने घरी येऊन आई-वडिलांना धमकी दिली होती. आम्ही मानकरी असून तुमच्यावर जाब देणार, आमचे घराणे काय आहे ते आठ दिवसात दाखवणार अशा धमक्या दिल्याने वडिल तणावात होते. त्यामुळेच त्यांनी त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यानुसार भादंवि कलम ३०६, ३४ नुसार तक्रार नोंदविण्यात आली होती.

सुनावणीत आठ साक्षीदारांच्या सानी नोंदविण्यात आल्या. साक्षीदार तत्कालीन उपसरपंच जयेश सावंत याच्याशी असलेले राजकीय वैमनस्य, तसेच तत्कालीन एका तलाठ्याकडील आर्थिक गैरव्यवहाराचे मृतावरील आरोप या गोष्टी पुराव्यात उघड झाल्याने तसेच साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा न आल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!