विजयदुर्ग किल्ल्या नजीकच्या आरमार सृष्टीमुळे देशी-विदेशातील पर्यटकांना खेचण्याची संधी

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते विजयदुर्ग आरमार सृष्टी कार्यक्रमाचा शुभारंभ

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मुळे या संकल्पनेला मिळाली गती

जागतिक वारसा स्थळांमध्ये होणार समावेश

विजयदुर्ग किल्ला ही देवगडची ओळख असून आरमार सृष्टी उभारल्यानंतर वाढलेल्या देश परदेशातील पर्यटकांना पर्यटन सेवा देताना स्थानिकांनी स्वतःचा रोजगार निर्माण करावा तरच या प्रकल्पाचं सार्थक होईल, असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी विजयदुर्ग मध्ये केले. विजयदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहावर आरमार सृष्टीचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. ते पुढे म्हणाले, “प्रमोद जठार यांनी या आरमार सृष्टी प्रकल्पासाठी अथक मेहनत घेतली असून इथे येणारे पर्यटन प्रकल्प स्थानिकांची आर्थिक समृद्धी वाढविण्यात यशस्वी ठरतील. मात्र येथील सरपंचानी आणि ग्रामपंचायतीने आपल्या गावात काय काय होतंय याची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत” , असं सांगितलं. दरम्यान, पुढचा आमदार आपणच असणार हे स्पष्ट करताना येणारा भविष्यकाळ स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीचा असेल हा ठाम आशावाद व्यक्त केला. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत विजयदुर्ग शासकीय विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “आरमार सृष्टी” या भव्य प्रकल्प बांधणीचं भूमिपूजन कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, धुळप घराण्याचे वारसदार रघुनाथराव धुळप, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, डी. वाय. एस. पी. आढाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड,माजी जि.प.उपाध्यक्ष आरीफ बगदादी, प्रकाश देशपांडे, पडेल भाजप अध्यक्ष बंड्या नारकर, अविनाश गोखले, प्रियांका साळस्कर, पडेल महिला अध्यक्षा संजना आळवे, भाजप जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, संदीप साटम आदी उपस्थित होते.
“आरमार सृष्टी” साकारताना मराठा आरमार संग्रहालय, व्हीविंग गॅलरी, सुसज्ज टाॅयलेट, अंतर्गत रस्ता, विश्रामगृह नूतनीकरण, सेल्फी पाॅईंट, ऐंटरेन्स गेट, आवार भिंत आदींसाठी साडे चार कोटी रूपये खर्च होणार आहेत.
विजयदुर्ग किल्ला हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला अजिंक्य आणि अभेद्य किल्ला आहे. या प्रकल्पामुळे छत्रपतींचे आरमारातील प्रभुत्व आणि दूरदृष्टी अनुभवण्यास मिळणार आहे. विजयदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दोन किल्ल्यांपैकी एक आहे ज्यावर छत्रपती शिवरायांनी स्वहस्ते भगवा ध्वज फडकवला होता. याच किल्ल्यात हेलियम वायूचा शोध लागला. नुकतीच युनेस्कोच्या टीमने जागतिक वारसा स्थळात विजयदुर्ग किल्ल्याला नामांकन मिळाल्याने या ऐतिहासिक वास्तूची पाहणी केली होती. त्यामुळे एकीकडे जागतिक वारसा स्थळामध्ये विजयदुर्ग किल्ल्याची निवड होईल असा आशावाद स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढून पर्यटक विजयदुर्ग मध्ये वास्तव्य करतील या दृष्टीने सिंधुरत्न समृद्ध जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार सृष्टी उभारण्यासाठी साडे चार कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. विजयदुर्गच्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हा भव्य ऐतिहासिक प्रकल्प साकार झाल्यावर देशविदेशातील पर्यटकांची वर्दळ वाढून एकूण पर्यटन उद्योगास मोठी गती प्राप्त होणार आहे. यावेळी मराठा आरमाराचा थोडक्यात इतिहास, आरमार सृष्टी उभारण्यासाठी ज्यांनी मोठा वाटा उचलला ते मंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल प्रमोद जठार यांनी उहापोह केला. दरम्यान, सरपंच रियाज काझी, अजित गोगटे, रघुनाथराव धुळप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.

विजयदुर्ग प्रतिनिधी

error: Content is protected !!