यशोशिखरावर जाण्यासाठी आई-वडिल, गुरु, मित्र यासोबतच शत्रू आणि स्पर्धक सुद्धा आवश्यक !

माजी मुख्याध्यापिका सौ. स्वाती वालावलकर यांचे प्रतिपादन
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ कणकवली यांच्या वार्षिक गुणवंत गुणगौरव समारंभ उत्साहात
उत्तम नागरिक होण्यासाठी मातृपितृ आणि गुरुच्या ऋणाबरोबरच देशऋण ही मानणे आवश्यक आहे आणि आपल्याला घडवताना आई वडिलांनी केलेल्या त्यागाची जाणिव ठेवली पाहिजे असे प्रतिपादन गुणवंत विद्यार्थी गौरव प्रसंगी श्रीदेवी सातेरी हायस्कुल वेतोरेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. स्वाती वालावलकर यांनी केले. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ ता. कणकवली यांच्या वार्षिक गुणवंत गुणगौरव समारंभ २०१५ मध्ये फोंडाघाट येथे रविवार दि.१३ जुलै रोजी त्या बोलत होत्या. गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत होते.
या कार्यक्रमास मान्यवर पाहूणे म्हणून पंचायत समिती कुडाळचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री. प्रफुल्ल वालावलकर हे सुद्धा उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. वालावलकर म्हणाले की, विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील सुसंवाद हाच यशाचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रत्येकवेळी पहिल्याच प्रयत्नांत यश मिळेल असे नाही म्हणून अपयश पचविण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे. तसेच शालेय शिक्षण कमी असले तरी कर्तृत्वास मर्यादा नसतात. अध्यक्षीय भाषणांत श्री. दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत म्हणाले की, अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यां इतकाच अध्यापन करणारा गुरु सुद्धा महत्त्वाचा आहे. विद्यादान करताना गुरु कधी आपपर भाव ठेवत नाही.
या कार्यक्रमास ज्ञातीतील सुमारे ३० गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शालेय यशवंतांसोबत व्यावसायिक शिक्षण आणि तायक्वांदो सारख्या कलेतही प्राविण्य मिळविलेली मुले होती. कुडाळदेशकर सहयोग, डोंबिवली यांच्या तर्फे मुलांना वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पालक आणि ज्ञातीतील सुमारे 200 हून अधिक बंधु भगिनींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ आणि युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.