आंतरराष्ट्रीय ॲथलेटीक्स क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या ओम उन्हाळकरचे भव्य स्वागत
कुरगंवणे -खारेपाटण विभागाच्या वतीने करण्यात आला नागरी सत्कार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुरंगवणे या गावचा सुपुत्र असलेल्या ओम उन्हाळकर याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेपाळ पोखरा येथे पार पडलेल्या ३००० मीटर धावणे क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्य व भारत देशाला सुवर्णपदक प्राप्त करून दिल्याबद्दल नुकताच त्याचा खारेपाटण येथे भारतीय जनता पार्टी खारेपाटण विभागाच्या वतीने तसेच खारेपाटण येथील सामाजिक मंडळे व नागरिकांच्या वतीने माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी खारेपाटण गावच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव,कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच बबलू पवार,माजी सरपंच वीरेंद्र चिके, किशोर माळवदे,श्री विजय ढमाले, प्रदीप मोहिरे,संदीप सावंत,अरुण कर्ले आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण विभाग भाजप पक्षाच्या वतीने ओम उन्हाळकर याचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तर नागरिकांच्या वतीने यावेळी थेट नेपाळ हून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दाखल झालेल्या ओम उन्हाळकरचे जोरदार स्वागत नागरिकांच्या वतीने करण्यात आले.तर त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याच्या विजयाची भव्य रॅली खारेपाटण ते ओम उन्हाळकरचे मुळगाव असलेल्या कुरंगवणे गाव पर्यंत काढण्यात आली.या रॅली मध्ये सर्वांनी आनंदाने सहभाग घेऊन त्याला शुभेछा दिल्या.
यावेळी खारेपाटण,नडगिवे, कुरंगवणे,शेर्पे या गावच्या वतीने देखील ओम उन्हाळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी शेर्पे माजी सरपंच श्रीम.निशा शेलार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.