खारेपाटण शुकनदी मध्ये जलवाहतूक सुरू करून पर्यटनास चालना देण्याची मागणी

नामदार नितेश राणे यांना भाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी दिले निवेदन

खारेपाटण येथील भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सकल मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशी या संघटनेचे अध्यक्ष श्री रमाकांत राऊत यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची नुकतीच मुंबई मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेऊन खारेपाटण येथील शुक नदीत पारंपरिक असलेली व सद्या लोप पावलेली जल वाहतूक पुन्हा सुरू करून पर्यटनास चालना देण्याबाबतेचे निवेदन सादर केले.
महाराष्ट्र विधान भवनात सद्या पावसाळी अधिवेशन सुरू असून रमाकांत राऊत यांनी नामदार पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन सकल मराठा समाज खारेपाटण विभागाच्या वतीने त्यांनी लेखी निवेदन दिले. दरम्यान खारेपाटण शुकनदी ही रत्नागिरी सिंधूदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारी बारमाही वाहणारी नदी असून ती थेट वाघोटन खाडी करून विजयदुर्ग बंदराला जावून मिळणारी असून सुमारे १९८५ पर्यंत येथून विजयदुर्ग बंदर ते खारेपाटण घोडेपाथर बंदर अशी जलवाहतूक सुरू होती.यामध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ,मंगलोरी कौल, ओली सुखी मासळी व लाकूड वाहतूक व्यवसाय होत असे.दरम्यान सातत्याने पूर येऊन खारेपाटण शुक नदीतील पात्र गाळाने पूर्ण भरले असून परिणामी नदीची रुंदी व खोली कमी होऊन जलवाहतूक बंद झाल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तरी देखील मोठी गलबते शिडाची जहाजे सोडली तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या व मासेमारी करणाऱ्या छोट्या यांत्रिकी होड्या अलीकडच्या काळात देखील शुक नदीत येत होत्या.त्या पुन्हा देखील येऊ शकतात.राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे २०० मिटर च्या अंतरावर खारेपाटण घोडेपाथर बंदर असून या शुक नदीत पुन्हा जल वाहतूक सुरू केल्यास विजजदुर्ग खाडीला लागून असलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावाना याचा फायदा होऊ शकतो.यामुळे पर्यटनास चालना मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासास देखील चालना मिळू शकते असे श्री राऊत यांनी लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!