अंबुद उत्सव शनिवार १२ जुलै पासून

चार दिवस विविध साहित्यिक कार्यक्रम

स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अंबुद” हा वार्षिक पावसाळी साहित्यिक उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा उत्सव १२ , १३, २६ आणि २७ जुलै या चार दिवशी कुर्ला नेहरूनगर येथील प्रबोधन प्रयोगघरात सायंकाळी ५ ते ९ या वेळेत संपन्न होणार आहे.
शनिवार १२ जुलै रोजी उत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी रामदास फुटणे यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अध्यक्षस्थान भूषवतील. दिग्दर्शक देवेंद्र पेम खास उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर राजकीय संपादक उदय तानपाठक हे फुटाणे यांची मुलाखत घेणार असून पहिल्या दिवसाची सांगता शशिकांत तिरोडकर, सई लळीत आणि सतीश कानविंदे यांच्या हास्य कवी संमेलनाने होणार आहे.
रविवार १३ जुलै रोजी उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे अध्यक्षस्थान भूषवतील ज्येष्ठ संपादक विनायक पात्रुडकर. ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुस्कर खास उपस्थित राहतील. यावेळी देहदान या विषयावर अभिनेता अंकुर वाढवे आणि जे जे रुग्णालयाचे डॉ. रेवत कानिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी मुलाखत घेतील. त्यानंतर डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘ आयुष्य थोडे चित्र, बरेच विचित्र ‘ हा एकपात्री कार्यक्रम सादर होईल.
शनिवार २६ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेता नारायण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे तिसरे पुष्प गुंफले जाणार असून ज्येष्ठ संपादक श्रीकांत बोजेवार यांची ज्येष्ठ संपादक मुकेश माचकर यांनी घेतलेली मुलाखत ही या दिवसाचे खास आकर्षण आहे. त्यानंतर राजकीय, सामाजिक भाष्यकार श्याबी परेरा यांची संदेश कामेरकर मुलाखत घेतील.
रविवार २७ जुलै रोजी ज्येष्ठ संपादक संजीव साबडे आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत उत्सवाचा समारोप होईल. यावेळी ‘ घन ओथंबून येती ‘ हा पाऊस कविता आणि पाऊस गीतांचा कार्यक्रम सादर होईल. त्यात मालवणी कवी दादा मडकईकर आणि कवयित्री प्रा. वृषाली विनायक यांच्यासह दीपक दास, सुयोग मराठे, अमृता देशमुख आणि गणेश तावडे हे गायक कलावंत सहभागी होतील.

चार “मराठी” कार्यकर्त्यांना “अंबुद” पुरस्कार
मराठी भाषा संवर्धन, प्रचार आणि प्रसार करणारे विनय नारायण, मंगेश चव्हाण, गायत्री पन्हाळकर आणि अशोक जाधव या चौघांना या उत्सवात “अंबुद”पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

error: Content is protected !!