पोलीस हवालदार विश्वजीत विश्वजीत परब यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव

कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक पोलीस म्हणून विश्वजीत परब यांची होती विशेष ओळख

सिंधुदुर्ग पोलीस दलात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व कडक शिस्तीचे पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेले सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयातील पोलिस हवालदार विश्वजीत परब यांना पोलीस महासंचालकांकडून त्यांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रमामध्ये हे सन्मानचिन्ह शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विश्वजीत परब हे सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये परिचित असे नाव असून प्रामाणिक व कडक शिस्तीचे कर्मचारी म्हणून त्यांची ओळख आहे. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी 6 वर्षे मालवण पोलीस स्टेशन, त्यानंतर 6 वर्ष सावंतवाडी पोलीस स्टेशन, त्यानंतर 6 वर्षे कणकवली पोलीस स्टेशन, जिल्हा वाहतूक शाखा 5 वर्ष, त्यानंतर कणकवली पोलीस स्टेशन 3 वर्ष आता जिल्हा पोलीस मुख्यालय 3 वर्ष एवढ्या सेवा काळात विश्वजीत परब यांनी केलेले काम, गुन्ह्यांच्या उघडकीस केलेली महत्त्वाची कामगिरी व प्रामाणिकपणे बजावलेली सेवा या कारणाने त्यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून सन्मान चिन्ह जाहीर झाले. 1993 मध्ये विश्वजीत परब हे पोलीस दलात रुजू झाले. कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी वाहतूक पोलीस म्हणून कामगिरी बजावताना त्यांचा अनेकदा विशेष उल्लेख झालेला होता. माध्यमानी देखील त्यांची वारंवार दखल घेतली. विश्वजीत परब यांचा हा सन्मानचिन्ह देत गौरव झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!