कृषी मित्र खताबाबत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार नाही
खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांकडून यांच्याकडून स्पष्टीकरण
सुशांत नाईक विधानसभेसाठी इच्छुक त्यामुळे हा खटाटोप
कृषी मित्र या खताचा पुरवठा संघाकडून करण्यात आलेला आहे. परंतु शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नाही. यावर्षी देवगड येथे झालेल्या तक्रारीनंतर खताचा नमुना तपासणीसाठी पाठवलेला असून प्रयोगशाळेचा अहवाल येणे बाकी आहे. त्यात काही दोष आढळल्यास ती जबाबदारी कंपनीची असणार आहे. मात्र सुशांत नाईक या विषयात राजकारण करून खरेदी विक्री संघाची बदनामी करत लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयात लक्ष घालण्याअगोदर आपल्या एजन्सी मार्फत सर्वसामान्य गॅस ग्राहकांना जो त्रास व ग्रामीण भागात जादाचा आर्थिक लागतो त्यात लक्ष घातले तर फार बरे होईल, अशी टीका कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत व उपाध्यक्ष सुरेश ढवळ यांनी केली आहे.
या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कृषीमित्र हे मिश्र खत असून त्याचा पुरवठा आमच्या संघामार्फत शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच खत वितरित करण्यात आले. त्यामुळे या खतामध्ये काही दोष असल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कंपनीकडून पुढील कार्यवाही होईल.
देवगड येथे या खताच्या नमुन्याबाबत काही दोष असतील तर ते प्रयोगशाळा अहवालानंतर निश्चित होतील. खतातील दोषांबाबत शासकीय धोरणानुसार कंपनीवर कार्यवाही होईल व शेतकऱ्यांनाही त्याबाबतचा जो काही मोबदला देय असेल ते शासन व कंपनीच्या धोरणानुसार निश्चित होईल. मात्र अद्याप प्रयोगशाळेचा अहवाल प्रलंबित असताना शासन मान्यतेच्या खताची विक्री केलेल्या खरेदी विक्री संघाची बदनामी करणे, संयुक्तिक नाही. अशाप्रकारे बदनामी करण्यामागे श्री नाईक यांचा काही वेगळा हेतू आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे, असेही श्री सावंत व श्री ढवळ यांनी म्हटले आहे.
खरेदी-विक्री संघ हे संघाच्या स्थापनेपासून खत, बी बियाणे याची विक्री शेतकऱ्यांना माफक दरात करतात. कृषी मित्र खताबाबत कुठच्याही शेतकऱ्याची संघाकडे तक्रार नाही. मात्र सुशांत नाईक हे शेतकऱ्यांना भडकवून तक्रार देण्यास भाग पाडत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आमदार नितेश राणे यांचा संघांच्या खत किंवा अन्य कोणत्याही खरेदी विक्री व्यवहाराशी कसलाही संबंध नसताना केवळ आपल्या राजकीय प्रसिद्धीपोटी सुशांत नाईक यांच्यावर आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांवर आरोप केले की प्रसिद्धीत येता येते हा त्यांचा जुनाच पायंडा आहे. आता तर विधानसभेची निवडणूक जवळ आली असल्याने व ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याने ते हा नाहकचा खटाटोप करत आहेत.
विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी सुशांत नाईक यांचे कारनामे अलीकडेच पुढे आले होते. वरिष्ठ पातळीवर आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यावर पोरकटपणे टीका करून आमदारकीची स्वप्ने पाहत खताच्या गुणवत्तेबाबत जो अहवाल येईल त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चितपणे होईल. परंतु सुशांत नाईक यांनी या साऱ्यात लक्ष घालण्या अगोदर आपल्या गॅस एजन्सी मार्फत आज ग्राहकांना 15 ते 20 दिवस सिलेंडर मिळत नाहीत. ग्रामीण भागात गाड्या पोहोचत नाहीत, तेथे जादाची आकारणी केली जाते या साऱ्याकडे लक्ष देऊन सेवा दिली तर अधिक उचित ठरेल असा टोलाही श्री. सावंत व श्री ढवळ लगावला आहे.
कणकवली, प्रतिनिधी