अल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ
पोलिसांकडून संशयित आरोपीला अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी
पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्याकडून आरोपीचा पर्दाफाश
परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्या संशयित युवकाला कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ यांच्यासह पथकाने अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करत आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली तालुक्यातील एका क्रशरवर पीडित युवती आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होती. ती युवती आपल्या कुटुंबीया सहीत गावी गेली असताना तिच्या वारंवार पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूर येथील एका रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. या तपासणी दरम्यान सदर पीडित युवती ही सहा महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यामुळे याप्रकरणी सदर युवतीने दिलेल्या माहितीनुसार पोक्सो कायद्यान्वये संशयीत आरोपी विरोधात कोल्हापूर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. व सदर गुन्हा शून्य नंबरने कणकवली पोलिसांकडे अधिक तपासासाठी वर्ग करण्यात आला. ही घटना जानेवारी ते जून 2024 या कालावधीमध्ये घडली. दरम्यान या युवतीने सुरुवातीला आपण कामावर राहत असलेल्या ठिकाणी एक युवक येऊन सातत्याने अत्याचार करत होता अशी माहिती पोलिसांना दिली. मात्र तिच्याकडून संशयित आरोपीचे नाव व अन्य माहिती बाबत अपुरी माहिती मिळत असल्याने पोलीस तपासात अडचण निर्माण होत होती. दरम्यानच्या काळात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ हे आपल्या टीम सहित त्या युवतीकडे दाखल झाले व त्यांनी याबाबत त्या युवती कडून अधिक ची माहिती घेत तपास सुरू केला. मात्र त्या युवतीकडून तरी देखील संदीग्ध माहिती दिली गेली. त्यामुळे संशयित आरोपी पर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले होते. त्या युवतीचा वर्षभरापूर्वी साखरपुडा देखील ठरला होता. त्यामुळे खरी माहिती समोर आली तर बदनामी होईल या भीतीने त्या युवती व तिच्या कुटुंबीयांकडून संदिग्ध माहिती दिली जात असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. या प्रकाराने पोलीस देखील चक्रावून गेले होते. दरम्यान पोलिसांना या प्रकरणी संशय वाटल्याने श्री. हडळ व त्यांच्या टीमने खोलात जाऊन अधिक माहिती घेतली असता त्या पीडित युवतीच्या वडिल व कुटुंबियांकडे कसून तपास केला असता त्या पीडित युवतीच्या चुलत भावानेच तिच्यावर सातत्याने बलात्कार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ कोल्हापूर येथे तो राहत असलेल्या ठिकाणाहून अटक केली. दरम्यान संशयित आरोपीला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली