वझरेतील कंपनीकडून स्थानिकांवर अन्याय

टॅक्सी, डंपर,रुग्णवाहिकेबाबतची आश्वासने फोल, आमदार केसरकरांना साकडे
वझरे येथील वेदांत स्टील कंपनीकडून स्थानिकांना दिली गेलेली आश्वासने पूर्ण केली जात नसल्याने कंपनीवर अवलंबून असलेल्या युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच लक्ष्मण गवस यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वझरे येथील वेदान्त स्टील, कोक आयर्न कंपनी कंपनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची व व्यावसायिकांची फसवणूक करीत आहे.
कंपनीच्या आत माल वाहतूक करणारे तीन डंपर होते, त्यातील एक डंपर अचानक कमी केल्याने स्थानिक मालकाचे दरदिवशी मोठे नुकसान होत आहे.
कंपनीसाठी तीन टॅक्सी चालू असून, किलोमीटरचा योग्य तो मोबदला मिळत नाही. स्थानिक टॅक्सीधारकांना टॅक्सीचे पासिंग ५ वर्षाच्या आतील असावे, असा नियम घातलेला आहे. मात्र , गोवा येथील १० वर्षांवरील टॅक्सी भाडेतत्वावर कायम ठेवून स्थानिक लोकांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मागणी केलेली रुग्णवाहिका सर्व सोयींनी युक्त असेल, असे आश्वासन कंपनीने स्थानिकांना दिले होते. रुग्णवाहिकेसाठी एक ड्रायव्हर, एक एम.बी.बी. एस. डॉक्टर, एक नर्स असा कर्मचारी वर्ग २४ तास उपलब्ध असेल, असेही सांगितले होते. मात्र, यातही स्थानिकांची फसवणूक केली असून , गोव्यातील एक रुग्णवाहिका फक्त चालकासह आणून ठेवली आहे. त्यावर डॉक्टर अथवा परिचारिका उपलब्ध नाही.
दरम्यान, कंपनीची छोटी-मोठी कामे स्थानिक लोकांना डावलून बाहेरील लोकांना दिली जात आहेत. कॉप्युटर ऑपरेटर आणि इतर स्टाफही गोव्यातील ठेवला आहे. याबाबतीत व्यवस्थापनाला विचारायला गेल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. संबंधित ठेकेदाराला विचारा, आमचा काहीही संबंध नाही असे सांगितले जाते,असे निवेदनात म्हटले असून आमदार केसरकर यांनी यात लक्ष घालून कंपनी व्यवस्थापनाला योग्य समज द्यावी व स्थानिकांवर होणारा अन्याय व त्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी केली आहे.
केसरकर यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) पदाधिकारी भगवान गवस,राजू निंबाळकर,बबलू पांगम,जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, माटणे सरपंच बाबू गवस,प्रवीण गवस आदी होते.






