सदोष मनुष्यवध करण्याच्या प्रयत्नातून आरोपीची जामिनावर मुक्तता

पोलिस पाटील प्रशांत नामदेव धुरी यांच्या अंगावर बेदरकारपणे वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या तालिब हमीद शेख याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
संशयित आरोपीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गोदडवाडी, कुडाळ येथील तालिब हमीद शेख याने आपल्या वाहनात चारापाण्याची व्यवस्था न करता तपकिरी रंगाचा बैल बांधून ठेवला होता. तसेच, त्याने आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने चालवत पोलिस पाटील प्रशांत धुरी यांच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. धुरी यांनी प्रसंगावधान राखून वाहन चुकवल्याने ते बचावले.
या प्रकरणी पोलिसांनी तालिब हमीद शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, २८१ व ३(५), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ११(१)(अ), ११(१)(ड), ११(१)(ई), ११(१)(एच) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १८५, ६६ व १९२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. राजीव बिले, ॲड. दत्ताराम बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांनी काम पाहिले. ॲड. राजीव बिले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.





