कुडाळ व रत्नागिरीतील दुचाकी मेकॅनिक संघटना एकवटल्या

समस्यांवर संयुक्त तोडग्याचा निर्धार

कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांची संयुक्त बैठक नुकतीच कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत दुचाकी मेकॅनिकांच्या विविध समस्या, त्यावरील उपाययोजना आणि आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फैयाज खतीब, जिल्हा सचिव धनंजय कदम, जिल्हा संघटक पारस खानविलकर, पावस विभागाचे अध्यक्ष महेश पालकर, ज्येष्ठ पदाधिकारी जितेंद्र भुते उपस्थित होते. तसेच कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तेंडोलकर, उपाध्यक्ष संदेश गावकर, सचिव गुरुनाथ धुरी, सहसचिव शंकर सातार्डेकर, खजिनदार मोहित मेथर, सहखजिनदार सचिन परब, कुडाळ शहरप्रमुख दिवाकर मांजरेकर, उपशहरप्रमुख प्रकाश सातार्डेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
असोसिएशनचे सचिव गुरुनाथ धुरी यांनी मान्यवरांचे स्वागत करून बैठकीला सुरुवात केली. यावेळी जिल्हाध्यक्ष फैयाज खतीब यांनी संघटनेची स्थापना आणि उभारणी करताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. कुडाळ तालुका असोसिएशनने जिल्हा संघटनेच्या विस्तारासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करताना आवश्यकतेच्या प्रत्येक वेळी एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन कुडाळच्या संघटनेसोबत ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बैठकीत मेकॅनिकांना भविष्यात भेडसावणाऱ्या संभाव्य समस्या, त्यावरील उपाययोजना आणि संघटनेच्या माध्यमातून करावयाच्या कामांवर चर्चा झाली. कुडाळ असोसिएशनच्या सदस्यांनीही आपल्या अडचणी मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी दोन्ही संघटनांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. संघटनेतील प्रत्येक मेकॅनिकाचे हित हेच संघटनेचे प्रमुख ध्येय राहील, तसेच महत्त्वाचे निर्णय परस्पर चर्चा आणि सहमतीने घेतले जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आगामी काळात संघटनात्मक कार्याचा विस्तार, सदस्यांचे हित जपणे आणि मेकॅनिकांच्या प्रश्नांवर एकजुटीने काम करणे याबाबतही दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला.
शेवटी कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे सहसचिव शंकर सातार्डेकर यांनी उपस्थित मान्यवर व सदस्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!