घंटागाड्यांच्या दुरुस्तीचा अहवाल रखडला

कुडाळ न. पं.च्या सभेत नगरसेवकांचा संताप

फॉगिंगचेही नियोजन ढिसाळ

एकीकडे कुडाळ शहराच्या कचरा डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर असताना आता या कचरा उचळणाऱ्या तब्बल सहा घंटागाड्या गेल्या अनेक दिवस नादुरुस्त असल्याची बाब समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत नादुरुस्त घंटागाड्याबाबत अहवाल देण्याबाबत ठरले असताना अजून तो अहवालाच आला नसल्याची बाब आजच्या कुडाळ नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत समोर आली आणि सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर लवकरच यासाठी विशेष सभा लावून निर्णय घेऊ असे मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी सांगितले. या सभेत फॉग मशीनच्या अयोग्य नियोजनावरून उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कुडाळ नगर पंचायतची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी खंडू पोवळ, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सभेमध्ये एक 407 वाहन आणि एक घंटागाडी खरेदी करण्याबाबत विषय सभेत आल्यावर नादुरुस्त घंटागाड्यांचे काय झाले, असा प्रश्न सदस्यांनी विचारला. सध्या सहा घंटागाड्या ठिकठिकाणी बंद अवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीबाबत अहवाल देण्याचे तीन महिन्यांपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत ठरले होते, याची आठवण नगरसेवक मंदार शिरसाट यांनी करून दिली. तीन महिने होऊनही नगर पंचायत प्रशासनाने अहवाल सभेसमोर ठेवला नाही. याबाबत सर्वच नागरसेवकानी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. घंटागाड्यांच्या दुरुस्तीची बिले कोण देणार हा मुद्दा पण चर्चेत आला. उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी यावर नाराजी व्यक्त केली. तर गाड्या बंद आहेत याविषयी आम्हाला विश्वासात का घेतले नाही, अशी विचारणा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी केली. आठ दिवसात विशेष सभा लावून तोडगा काढू असे यावर बोलताना मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी सांगितले.
शहरात मच्छरांचा उपद्रव वाढला असून फॉगिंग मशीनचे प्रभागनिहाय योग्य नियोजन केले जात नाही याबाबत उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फक्त फोटो काढून दाखवण्यापूरता फॉगिंग मशीनचा वापर न करता नागरिकांना उपयोग होईल असा वापर सर्व वॉर्डमध्ये झाला पाहिजे असे किरण शिंदे यांनी सांगितले. नगर पंचायतचा आरोग्य विभाग उदासीन का, असा सवाल करत शिंदे यांनी सर्व प्रभागात फॉगिंग मशीनचा समान वापर झाला पाहिजे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
दरम्यान एमआयडीसी येथील घनकचरा प्रकल्प, त्यामध्ये बसविण्यात येणारी यंत्रसामग्री, शेड याविषयी पण सभागृहात चर्चा झाली. नगर पंचायतची वाहने धुण्यासाठी सर्व्हिसिंग पंप घेणे, रस्त्यावरचा कचरा हटविण्यासाठी ब्लोअर खरेदी करणे, जेसीबी खरेदी करणे आणि त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणे याविषयी चर्चा करण्यात आली.
शहरात विद्युत खांब असलेल्या ५५ ठिकाणी पथदिवे नाहीत ही बाब बैठकीत समोर आली. त्यावर चर्चा करण्यात आली. शहरात नोंदणीकृत २३४ पथ विक्रेते आहेत, त्याना जागा आणि ओळखपत्र देताना स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेच्या शेवटी मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी आपल्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण देताना कोणीही या नियुक्तीबाबत चुकीची माहिती देऊ नये असे आवाहन केले. आपली नियुक्ती ऑक्टोबर २०२६ पर्यंत असली तरी त्यात ‘पुढील आदेश येईपर्यंत’ असा देखील पर्याय आहे. त्यामुळे आपल्या नियुक्तीच्या मुदतीबाबत चुकीची माहिती कोणी देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. त्याला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी देखील दुजोरा दिला.

error: Content is protected !!