बांबर्डेवासीयांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण

भरपाईतील दिरंगाई,पंचनाम्यांतील फेरफार , योजनांमधील गैरव्यवहारांविरोधात शेतकरी आक्रमक


वन्यप्राण्यांकडून शेतीची होणारी नुकसानभरपाई देण्यास दिरंगाई होत असून, पंचनाम्यांतील फेरफार आणि वनविभागाच्या विविध योजनांमधील गैरव्यवहारांविरोधात बांबर्डे येथील दौलत राणे, मदन राणे आणि सिद्धेश राणे यांनी बुधवार दि.२१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळपासून दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.ते आज ,गुरुवारीही सुरू आहे.

या उपोषणाला महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला.तालुक्यात वन्य हत्ती, रानडुक्कर, गवे, माकडे, साळींदर आदी वन्यप्राण्यांकडून भातशेतीसह काजू, नारळ, सुपारी, केळी आणि अन्य फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पुरेशी आणि वेळेत नुकसानभरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे. नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यास विलंब होणे, तसेच पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय फेरफार केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जि. प. माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, उपजिल्हाप्रमुख संदीप गवस, सुदेश तुळसकर, नगरसेवक चंदन गावकर, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दळवी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, सामाजिक कार्यकर्त्या जेनिफर लोबो, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, काँग्रेसचे पदाधिकारी बाळा धाऊसकर आणि तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला. उपोषणकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी संदेश राणे यांनी नुकसानभरपाईच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित केला. सहा गुंठे क्षेत्रात सात हजार केळीची लागवड केल्याचे सांगितले जात असताना अशा प्रकरणांत सरसकट नुकसानभरपाई कशी दिली जाते? अशी विचारणा त्यांनी केली. नुकसानभरपाई निश्चित करताना प्रत्यक्ष लागवड, क्षेत्र आणि नुकसानीची पडताळणी नेमकी कशी केली जाते, याबाबत स्पष्टता देण्याची मागणीही या चर्चेतून पुढे आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान उपोषणकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.त्यामुळे निरुत्तर अधिकारी परत गेले.रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरू होते.

……………………
संभाजी पाटील, शुभम वारके यांना बडतर्फ करा

शासकीय योजनांच्या नावाखाली कोट्‌यवधींचा घोटाळा, वृक्षतोडीला पाठिंबा देणाऱ्या व माहितीचा अधिकार २००५ अन्वये माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी आनंदा पाटील व त्रिस्तरीय समितीने केलेल्या वन्यप्राणी नुकसानीच्या पंचानाम्यामध्ये छेडछाड करणाऱ्या मुजोर बांबर्डे वनरक्षक शुभम संभाजी वारके यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे,अशी मागणीही उपोषणकर्त्यांची आहे.

error: Content is protected !!