संविता आश्रमाला रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून ८.३० लाखांची मदत

२७ सदस्यांचा पाच वर्षांसाठी सेवासंकल्प

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेनी डी कोस्टा यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

निराधार, अनाथ आणि गरजू व्यक्तींच्या संगोपनासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्था संचालित संविता आश्रम, पणदूर यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने पाच वर्षांसाठी ८ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा सेवासंकल्प करण्यात आला आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. लेनी डी कोस्टा यांच्या हस्ते या रकमेचा धनादेश जीवन आनंद संस्थेचे संचालक संदीप परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या २७ सदस्यांनी दरमहा प्रत्येकी ५०० रुपये देण्यास सहमती दर्शवली आहे. या सामूहिक योगदानातून पाच वर्षांत ८ लाख १० हजार रुपये जमा होणार आहेत. त्यात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. लेनी डी कोस्टा यांनी वैयक्तिक स्वरूपात दिलेल्या २० हजार रुपयांची भर पडल्याने एकूण मदतीची रक्कम ८ लाख ३० हजार रुपये झाली आहे.
संविता आश्रमात निराधार आणि गरजू व्यक्तींच्या संगोपनासाठी सुरू असलेल्या सेवाकार्याला या आर्थिक मदतीमुळे हातभार लागणार आहे. अन्न, औषधोपचार, निवारा आणि आवश्यक सुविधांसाठी अशा स्वरूपातील नियमित मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या सदस्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सामूहिक योगदानातून गरजू व्यक्तींना आधार देण्याचा हा उपक्रम माणुसकी आणि सेवाभावाचे उदाहरण ठरत आहे.
रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले. निराधारांच्या जीवनात आधार आणि आशा निर्माण करण्यासाठी अशा सेवाभावी उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!