गोंधयाळेतील टोक्यांच्या उपद्रवाबाबत FCI ला कारवाईचे आदेश

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे पत्र

रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश

तालुक्यातील नेरूर गोंधयाळे येथील MSWC / FCI धान्य गोदामातून परिसरातील घरांमध्ये पसरणाऱ्या टोक्यांच्या (किडींच्या) उपद्रवाची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) पनवेल येथील विभागीय व्यवस्थापकांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यामुळे यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून गोंधयाळे परिसरातील नागरिकांना गोदामातील किडींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे टोके (किडी) घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांची झोपमोड होणे, त्वचेला खाज येणे, ॲलर्जीमुळे खोकला येणे तसेच अन्नपदार्थांमध्ये टोके आढळणे, अशा तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या.
या समस्येबाबत रुपेश पावसकर यांनी ८ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग यांनीही आपल्या अहवालांतून या तक्रारींना दुजोरा दिल्याचे सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेतील जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे FCI च्या विभागीय व्यवस्थापकांना कार्यवाहीचे निर्देश दिले. गोदाम आणि तेथे साठवण्यात येणारे धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित FCI अधिकाऱ्यांची असल्याचे नमूद करत या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यास पत्रात सांगण्यात आले आहे.
यापूर्वी कुडाळ येथील साठा अधीक्षकांनी पावसाळ्यापूर्वी फवारणी केली जात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही टोक्यांचा (किडींचा) उपद्रव कायम असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता गोदामात प्रभावी धुरीकरण आणि कीटकनाशक फवारणी करून समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.

सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा

या आदेशाचे स्वागत करताना रुपेश पावसकर म्हणाले, “हा गोंधयाळे ग्रामस्थांच्या लढ्याचा पहिला विजय आहे. प्रशासनाने आमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. आता FCI ने सात दिवसांत कार्यवाही न केल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषण करू. हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
आता FCI प्रशासन या आदेशानुसार किती लवकर आणि कोणती ठोस उपाययोजना करते, याकडे गोंधयाळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!