घोटगेवाडीच्या सुपुत्राची वन्यजीव छायाचित्रणात आंतरराष्ट्रीय भरारी!

सीताराम राऊळ यांना ‘अपृष्ठवंशी ’ श्रेणीत विजेतेपदाचा मान
सध्या बदलापूर ,मुंबई येथील व मूळ घोटगेवाडीचे (दोडामार्ग,सिंधुदुर्ग )सुपुत्र वन्यजीव छायाचित्रकार सीताराम दिनकर राऊळ यांनी लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या ‘ वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२६ ‘या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत ‘ श्रेणी विजेतेपद ‘ (कॅटेगरी विनर) पटकावले आहे.
राजस्थानच्या थर वाळवंटात कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी वाळू उडवत बीळ तयार करणाऱ्या विंचवाचा दुर्मीळ क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. त्यांच्या या ‘ शिफ्टिंग सॅण्ड ‘ छायाचित्राला ‘ वर्तन : अपृष्ठवंशी’ श्रेणीत प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
जगभरातून आलेल्या ६५ हजारांहून अधिक छायाचित्रांमधून त्यांच्या छायाचित्राची निवड झाली. वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च स्पर्धांपैकी ही एक असून, तिला या क्षेत्रातील ‘ऑस्कर’ मानले जाते. राऊळ यांचे हे यश महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या राऊळ यांना चित्रकलेचीही आवड आहे. रंग, रचना, प्रकाश आणि अभिव्यक्तीचे भान त्यांच्या छायाचित्रणात दिसते. यापूर्वी त्यांच्या कामाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले असून, हे विजेतेपद त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे यश ठरले आहे.
………………
१४ वर्षांचा छायाचित्रण प्रवास
राऊळ गेल्या १४ वर्षांपासून छायाचित्रण क्षेत्रात कार्यरत असून वन्यजीव, मॅक्रो आणि क्रिएटिव्ह नेचर फोटोग्राफीमध्ये त्यांना विशेष रस आहे. दुर्लक्षित नैसर्गिक क्षण टिपणे, प्रकाशाचा कल्पक वापर आणि वेगळी दृश्यात्मक मांडणी ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत.
…………………………
राऊळ यांचा गौरव जैवविविधतेच्या संवर्धनाला दिशा देईल
प्रतिष्ठित ‘ वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ स्पर्धेत राऊळ यांनी मिळवलेला बहुमान तिलारी परिसरासाठी अभिमानास्पद आहे. वन्यजीव संवर्धन म्हटले की सहसा वाघ किंवा हत्तींसारख्या मोठ्या प्राण्यांवरच लक्ष केंद्रित होते; मात्र परिसंस्थेचा पाया विंचू, कीटक आणि इतर अपृष्ठवंशी सूक्ष्म जीवांवरही आधारलेला असतो, हे या पुरस्कारप्राप्त छायाचित्राने सिद्ध केले आहे.
तिलारी खोरे हे अशा हजारो दुर्मीळ, सूक्ष्म आणि दुर्लक्षित जीवांचे समृद्ध माहेरघर आहे. राऊळ यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे आपल्या स्थानिक परिसंस्थेचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले असून, दोडामार्ग आणि तिलारी खोऱ्यातील स्थानिक युवकांसाठी हा दीपस्तंभ ठरेल. येथील तरुण पिढीला निसर्गाकडे, छायाचित्रणाकडे आणि वैज्ञानिक दृष्टीने जैवविविधतेच्या दस्तऐवजीकरणाकडे करिअर म्हणून पाहण्याची प्रेरणा देईल,अशी प्रतिक्रिया
सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक तथा वनश्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली.






