सावंतवाडी मतदारसंघ उबाठा शिवसेनेचाच

बाबूराव धुरी:कुणीही आमदार होण्यासाठी हा मतदारसंघ नाही
कोकण नाऊ l News Channel
दोडामार्ग सावंतवाडी मतदारसंघ हा उबाठा शिवसेनेचाच आहे. जिल्ह्यातील कुणीही यावे आणि आमदार व्हावे यासाठी हा मतदारसंघ नाही, असे शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
सावंतवाडी – दोडामार्ग विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोणीही यावे आणि टिचकी मारून जावे, असा मतदारसंघ नसून या मतदारसंघाला संस्थानिक काळाचा वारसा आहे. मात्र अनेकांनी हा मतदारसंघ स्वतःच्या फायद्यासाठी वापरला आहे. यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता तावून सुलाखून बाहेर पडली आहे.त्यामुळे कुणीही स्वतःच्या फायद्यासाठी धनाचा वापर करून मतदारास कमी लेखू नये. कमी लेखणाऱ्यांची मस्ती उतरवण्याचा चंग मतदारांनी बांधला आहे. या मतदारसंघातून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलास आपला प्रतिनिधी केला केला तरच जनतेला न्याय मिळू शकतो हे मतदारांनी ओळखले आहे. त्यामुळे जनतेला आता बदल हवा आहे, असेही श्री.धुरी यांनी म्हटले आहे.
त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊगर्दी करणाऱ्या अनेकांचे कान टोचले असून सावंतवाडी मतदार संघ हा मूळ शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे व येथून आमचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावाही केला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, सलग दहा वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचाच अधिकार आहे आणि हा निकष राज्यातील इतर सर्व मतदार संघामध्ये आहे तसा सावंतवाडी मतदार संघासाठी आहे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मित्र पक्षांमध्ये काम करत असताना आपण निवडणूक ही अपक्ष लढवणार अशी भाषा कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे, सध्या महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय वरिष्ठ घेतील तो आपणास मान्य आहे असे समजून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे, असे म्हणत महाविकास आघाडीतील मित्रपक्षामधील निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांनाही सावध केले.सध्या अनेक धनाढ्य लोक लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पैसे देऊन मत विकत घेऊ अशा भ्रमात आहेत त्यांना मतदार घरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे