जलजीवन मिशनच्या सिंधुदुर्गातील प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात 8 जुलै रोजी बैठक
आमदार नितेश राणे यांनी वेधले होते विधानसभेत पाणीपुरवठा मंत्र्यांचे लक्ष
जिल्ह्यातील अनेक कामांमध्ये निर्माण झाला आहे सावळा गोंधळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या समस्यांचा पाढा विधानसभेत कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी वाचल्यानंतर या प्रलंबित कामांच्या बाबत तातडीने महत्त्वाची बैठक राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 8 जुलै रोजी आयोजित केली आहे. मंत्रालयात गुलाबराव पाटील यांच्या दालन क्रमांक 402, चौथा मजला मंत्रालय मुख्य इमारत, या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी याबाबत बैठकी चा पत्रव्यवहार आमदार नितेश राणे यांच्या कार्यालयाशी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामांच्या सावळ्या गोंधळाबाबत आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर या कामांमधील भोंगळपणा समोर आला होता. त्यामुळे या प्रश्नी आता या बैठकीत काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली