कोकण रेल्वे प्रवासत महिलेची पर्स गायब

काही तासांतच त्या महिलेच्या बँक खात्यातील १ लाख चोरट्याने केले गायब

अज्ञात चोरट्या विरोधात वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोकण रेल्वेतून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेत महिलेची पर्स गायब केली. पर्समध्ये मोबाईल, चष्मासह १२ हजार चा मुद्देमाल होता. काही तासांतच त्या अज्ञात चोरट्याने शक्कल लढवत मोबाईल व कागदपत्रांचा आधार घेत त्या महिलेच्या खात्यावरील एक लाख रुपयेही काढले. याबाबत प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ वय ५८ रा. आचिर्णे पिंपळवाडी यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तुतारी एक्स्प्रेस मध्ये २४ जून रोजी घडली. प्रिया ज्ञानेश्वर सकपाळ व त्यांचे पती २४ जून रोजी तुतारी एक्सप्रेसने आरक्षित डब्यातून दादर ते वैभववाडी असा प्रवास करत होते. रात्री ३ वा. च्या दरम्यान प्रिया संकपाळ या सीटवरुन खाली उतरत बाथरूम कडे गेल्या. परत त्या आपल्या सीटवर आल्या असता सीटवरील पर्स गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी पतीला उठवत हा प्रकार सांगितला. दोघांनी आजूबाजूला सर्वत्र शोधा शोध केली. मात्र पर्स आढळून आली नाही. पर्समध्ये मोबाईल तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्ड होते. मोबाईल चोरीस गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वैभववाडी येथील एसबीआय बँकेत जात खात्यातील पैसे चोरीला जाऊ नये म्हणून अकाउंट ब्लॉक करण्यासाठी त्यांनी अधिकारी यांना सांगितले. दरम्यान त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये गायब झाल्याचे त्यांना समजले. या प्रकारामुळे त्यांना अधिक धक्का बसला. पर्स मधील मोबाईल व कागदपत्राचा आधार घेत अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये गायब केले आहेत. प्रिया संकपाळ यांनी मंगळवार दि. २५ रोजी पोलीस ठाणे गाठले. घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलीसांना सांगितला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!