शोषितांना माणुस म्हणून जगण्याची संधी शाहू महाराजांनी दिली – प्रा.डॉ. आत्माराम कांबळे

जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती म्हणजेच सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

परस्परात शांतता व समृद्धीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याकरिता ‘सामाजिक न्याय’ म्हणून एक मूल्य जगात आहे. हे मूल्य जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी २६ जून या दिवशी “सामाजिक न्याय दिन” साजरा केला जातो.

२६ जून हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.

छत्रपती शाहू महारांजाची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शाहू महाराजाच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.ए. डी.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी शोषित आणि वंचितांना शिक्षण आणि नोकऱ्या देऊन त्यांनी प्रगतीचे पंख दिले. या समाजघटकांना माणूस म्हणून जगण्याची संधी आणि अधिकार दिला. यासह अनेक वर्षांच्या बलाढ्य व्यवस्थेच्या विरोधात सत्यशोधकी विचारांचा जागर करीत ते कणखरपणे उभा राहिले. त्यांचे जीवनकार्य अद्भुत आणि प्रेरणादायी आहे.त्यांच्या विचारांची पताका कायम फडकत रहावी यासाठी आपण सर्वजण मिळून काम करत राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २० वर्षांचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. महात्मा जोतीबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केल्या. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागांची तरतूद केली. स्त्री दास्यत्वमुक्त होण्यासाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. अन्याय दूर व्हावा म्हणून आवश्यक कायद्यांची निर्मिती केली. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय इत्यादी क्षेत्रात वाखाण्याजोग व अतुलनीय कामगिरीमुळेच राजर्षी म्हणून सन्मानित करण्यात आले, तसेच सर्व सामान्यांचा विचार करणारे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष म्हणजे राजर्षी शाहू महाराज तसेच मुलभूत स्वरूपाची क्रांती झाली पाहिजे ही अपरिहार्यता जाणून कार्य महाराजांनी कार्य केले या प्रसंगी असे प्रा.रश्मी देसाई यांनी व्यक्त केले.

माणसाला माणूस समजण्याची शिकवण देणारी यंत्रणा म्हणजे शाहू महाराज, समाज समताधिष्ठीत होण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतीक, सामाजिक विचारांना गती देणारा लोक राजा होय, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख मोहम्मद अली मुंशी यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, विज्ञान शाखा प्रमुख सहा. प्रा. सागर इंदप, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे विस्तार कार्य शिक्षक सहा. प्रा.गजानन व्हंकळी, सहा.प्रा.डॉ.वंदना शिंदे-व्हटकर, सहा.प्रा.तानाजी गोदडे, सहा.प्रा.प्रजोत नलावडे, ग्रंथपाल श्री. तन्मय कांबळे व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन विस्तार विभाग विस्तार कार्य शिक्षक सहा. प्रा.गजानन व्हंकळी यांनी दिली तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. प्रकाश शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन सहा. प्रा. रश्मी देसाई यांनी केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!