गणेश घाट सुशोभीकरणाचे पूर्ण श्रेय्य माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांचेच

मंदार शिरसाट यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावा
शहरातील भंगसाळ नदी येथील गणेश घाट सुशोभीकरणाचे संपूर्ण श्रेय माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचेच असा दावा कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मंदार शिरसाट म्हणतात, माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे आयोजित शिमगोत्सवाला तात्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आले असताना मी कुडाळ शहराचा उपनगराध्यक्ष म्हणून कुडाळ शहरामध्ये गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला गणेश घाट सुशोभीकरणाचे काम तात्काळ मंजूर व्हावे अशी मागणी कुडाळ शहरवासियांच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची तात्काळ दखल घेत आदित्य ठाकरे यांनी कुडाळ भंगसाळ नदी येथे गणेश घाट सुशोभीकरण कामासाठी तात्काळ ९० लाख मंजूर केले. त्याबाबत शासन निर्णय क्रमांक ननपं २०२२ /प्र.क्र . ६६(क ९५ – १)/नवी -१६) दि. ३० मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिली.
या कामाचा शासन निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे झाला आहे. त्या संदर्भात गणेश घाटाची रूपरेषा व त्या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रात प्रसारित देखील झाल्या होत्या. त्यामुळे कुडाळ शहरातील भंगसाळ नदी येथील गणेश घाट सुशोभीकरणाचे संपूर्ण श्रेय हे माजी खासदार विनायक राऊत,माजी आमदार वैभव नाईक यांचेच आहे असे कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी सांगितले आहे.





