कुडाळ बस स्थानकात ‘संशयास्पद’ वस्तू ; पोलिसांची मॉकड्रील

कुडाळ एसटी स्टॅन्डवर आज पोलिसांच्या बॉम्ब शोध-नाशक पथकाने मॉकड्रिल घेतली. कुडाळ बस स्थानकात एक संशयास्पद सॅक असल्याचे समजल्यावर लोकांनी कशी दक्षता घ्यावी आणि पोलिसांचे बॉम्बनाशक पथक तो बॉम्ब कसा निकामी करतो याचे प्रात्यक्षिक आज बसस्थानकाकांवरील प्रवाशांना पाहायला मिळाले. बीडीएस पथकाचे प्रमुख राजेंद्र गडेकर यांच्या नेतृत्वाखाली हि मॉकड्रील पार पडली.
सायंकाळची पाच साडेपाचची वेळ म्हणजे कुडाळ बस स्थानकातील सर्वात गर्दीची वेळ. शाळा, आस्थापना सुटण्याची वेळ. त्यामुळे साहजिकच एसटी बस पकडून आपापल्या घरी जाण्यासाठी प्रवाशी कुडाळ बसस्थानकात जमले होते. गाड्या फलाटावर लागत होत्या. पण त्याचेवेळी पोलिसांची गाडी स्थानकात येत. सोबत बॉम्ब शोधक पथक, श्वान पथकहि असते. एक लाल रंगाची सॅक फलाटावर पडलेली असते. ती सॅक संशयास्पद असल्याचा कॉल पोलिसांना आल्यावर पोलिसांनी बस स्थानकावर धाव घेतलेली असते. प्रवाशांना त्या सॅक पासून बाजूला केले जाते. बीडीएस पथकातील जवान आणि पोलीस श्वान ‘शेरा’ बस स्थानकाचा ताबा घेतात. कुडाळ पोलीस प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवतात. बीडीएस पथकातील एक जवान रांगत रांगत त्या सॅक कडे जातो. यंत्रांचा वापर करून त्यात बॉम्ब आहे कि नाही खात्री करतो. मग शेरा श्वानला तिथे आणलं जातं. तो देखील सॅक मध्ये बॉम्ब आहे कि नाही खात्री करतो. मग ती सॅक हुक लावून तिथून हलवली जाते आणि शेवटी ती सॅक वाहनातून जाते.
जवळपास अर्धा तास हि मॉकड्रील आज सायंकाळी कुडाळ बस स्थानकात घेण्यात आली. याविषयी कोणालाच कल्पना नव्हती त्यामुळे सुरुवातीला काय घडलंय हे प्रवाशांना कळत नव्हतं. पण हि मॉकड्रील असल्याचं कळल्यावर सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला. बीडीएस पथक प्रमुख राजेंद्र गडेकर, श्वान ट्रेनर श्री. राणे, श्वान ‘शेरा’, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्याची टीम यांनी या मॉकड्रीलमध्ये सहभाग घेतला. कुडाळ पोलीस ठाणे, अग्निशामक दल , रुग्णवाहिका यांचाही या मध्ये सहभाग होता. जर अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू कुठे दिसल्यास नागरिकांनी डायल ११२ वर संपर्क करावा असे आवाहन बीडीएसचे प्रमुख राजेंद्र गडेकर यांनी केले आहे.





