एनडीआरएफच्या निकषावर नुकसानभरपाई द्या – आमदार निलेश राणे

शेतकरी, बागायतदार आणि मच्छिमार यांचे करोडो रुपयांचे नुकसान

सततच्या आणि लांबलेल्या पावसामुळे कुडाळ मालवण मतदार संघात एकूण लागवड क्षेत्राच्या ३० ते ४० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. आंबा बागायतदारांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मच्छिमार, वॉटरस्पोर्टस यांचं देखील सुमारे २५ कोटींचं आर्थिक नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं आहे. त्यामुळे या सर्वाना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार निलेश राणे यांनी येथील एमआयडीसी रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंगरे, संजय पडते, दादा साईल आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, कुडाळ मालवण मतदार संघात मालवण मध्ये ९५०० हेक्टर तर कुडाळ मध्ये १३५५० हेक्टर मध्ये भातशेती लागवड होते. पावसामुळे या लागवड क्षेत्राचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील पिके कुजून गेली आहेत, त्यांना कोंब आले आहेत. काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. यात भातपिकाबरोबरच नाचणी आणि भुईमूग पिकांचा देखील अंतर्भाव आहे. ४० टक्के पीक सडले, त्यांना कोंब आले त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे.
त्याच बरोबर बागायतदार, मच्च्छिमार, वॉटरस्पोर्टसवाले, किल्ला होडी वाहतूक करणारे यांचेसुद्धा नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात साडेचार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड तर साडेआठ हजार क्षेत्रात काजू लागवड होते. कुडाळ तालुक्यात ३३७५ हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड तर १२ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रात काजू लागवड आहे. या पावसामुळे आंबा काजू पिकावर परिणाम झाला आहे. मोहोर लांबणीवर पडला आहे. जर तो मार्च नंतर आला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. असे आमदार राणे यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे पुढे म्हणाले, मच्छिमारांचे देखील नुकसान झाले आहे. जिल्हयात ३ हजार ५६१ नोंदणीकृत मासेमारी नौका आहेत. त्याशिवाय वॉटरस्पोर्टस वाले आणि किल्ले वाहतूक सेवा वेगळी आहे. फक्त मासेमारी बंद असल्यामुळे मच्छिमारांचे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वॉटरस्पोर्टस आणि किल्ला होडीसेवा वाल्यांचे १२ ते १३ कोटीचे नुकसान झाले आहे. मच्छिमार बांधवांचे एकूण २५ कोटीचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. ५० ते ६० ठिकाणीच पंचनामे झालेले आहेत.
आमदार राणे पुढे म्हणाले, याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता जी मदत दिली जाते ती एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. मराठवाड्यात अतिवृष्टी नंतर एनडीआरएफच्या निकषानुसार मराठवाड्यातील, शेतकऱ्यांना मदत दिली. त्याच एनडीआरएफच्या निकषानुसार  कोकणातील शेतकरी मच्छीमार या नुकसानग्रस्तांना मिळावी यासाठी आग्रही असल्याचे निलेश राणे म्हणाले. कोकणवासीयांची मी १ रुपया देखील कमीची नुकसानभरपाई घेणार नाही असे ते म्हणाले. नुकसान झाले बाबत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री  यांना लेखी पत्र मी अगोदरच दिले आहे. आता त्यांची भेट घेवून कोकणात पडणाऱ्या पावसाबाबत तसेच होणाऱ्या नुकसानीबाबत जाणीव करून देऊन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उष्णता, पाऊस यामुळे कोकणात होणाऱ्या नुकसानीबाबत वेगळी विशेष पॉलिसी नेमण्याकरता मी येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!