“बाप बाप होता है”! झुंड मे तो कुत्ते आते है! शेर अकेला आता है!
कणकवलीत शिवसेनेला डीवचनारा बॅनर
रत्नागिरी पाली मध्ये लावलेल्या बॅनर नंतर तोच बॅनर कणकवलीत
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे विजयी झाल्यानंतर या निवडणुकीतील महायुती अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. तर या अंकाची सुरुवात कणकवली मधून झाली. कणकवलीमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने भाजपा ला इशारा देणारा बॅनर लावण्यात आल्यानंतर या बॅनरला उत्तर देणारा आमदार नितेश राणे यांचा फोटो असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावून उत्तर देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते सुरू असलेले हे बॅनर युद्ध काल थेट रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या गावापर्यंत जाऊन पोहोचले. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा फोटो लावलेला बॅनर “बाप बाप होता है” अशा मथळ्याखालील बॅनर हा रत्नागिरी – पालीमध्ये लागल्यानंतर तोच बॅनर आज कणकवली पटवर्धन चौकात देखील लावण्यात आला. त्यामुळे महायुती मधील शिवसेना व भाजपमधील ही बॅनर युद्धाची ठिणगी आता टप्प्याटप्प्याने एका निर्णायक वळणावर येत असून, या बॅनर युद्ध मुळे राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे. कणकवली पटवर्धन चौकात आज “बाप बाप होता है” अशा मथळ्या खालील नारायण राणे यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला. व या बॅनर वर “झुंड मे तो कुत्ते आते है! शेर अकेला आता है!” असा देखील उल्लेख करण्यात आला आहे. बॅनरच्या बॅकग्राऊंडला वाघाचा फोटो लावण्यात आला आहे. जेणेकरून उदय सामंत यांना त्यांच्या गावात जात डिवचल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनाला देखील या बॅनरच्या माध्यमातून एक प्रकारे भाजपकडून डिवचण्यात आले आहे. त्यामुळे आता या बॅनर युद्धाचा पुढचा अंक काय असणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली