नाटळ ग्रामसभेमध्ये हाणामारी प्रकरणी एका गटाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल

धारदार चाकूने डोक्यावर गंभीर वार

अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्याकडून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा

दुसऱ्या गटाची तक्रार नोंदवण्याचे काम सुरू

कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या तहकूब ग्रामसभेमध्ये पोलिसांना दिलेल्या निवेदनाचा विषय घ्यावा यावरून चर्चा करत असताना गणेश मारुती सावंत व त्याचा भाऊ ऋषिकेश सावंत, प्रिमेन चोडणेकर हे सरपंचांच्या अंगावर धावून गेले व तेथे असलेल्या फिर्यादी दिनानाथ पंढरीनाथ सावंत (वय 66 नाटळ, आडयाचे टेंब) यांच्या डोक्यावर धारदार चाकूने पाठीमागाहून वार केल्याप्रकरणी गणेश मारुती सावंत याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत जखमी दिनानाथ पंढरीनाथ सावंत यांनी म्हटले आहे की नाटळ ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा आज 3 जून रोजी सरपंच सुनील घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. यावेळी तेथे ग्रामसेवक तेंडुलकर हे देखील उपस्थित होते. तसेच उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 31 मे रोजी नाटळ गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सावंत यांनी पत्र दिले होते. या पत्रामध्ये 16 मे रोजी सरपंच, उपसरपंच यांनी गावातील काही ग्रामस्थांना हाताशी धरून तंटामुक्ती अध्यक्ष हे गावात तंटे निर्माण करणे, बॅनर फाडणे, धमकावणे अशा गैरवर्तनाबाबत कणकवली पोलिसात निवेदन दिले होते. हा विषय ग्रामसभेमध्ये घ्यावा असे पत्र गणेश याने दिले होते. आज ग्रामसभा सुरू असताना गणेश सावंत हा सुरुवातीला तेथे आला व पाच दहा मिनिटे थांबून निघून गेला. त्यानंतर 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ ऋषिकेश व प्रिमेन चोडणेकर हे तिघेजण आले. ग्रामसभा सुरू झाल्यावर गणेश यांने मी दिलेल्या अर्जावर तात्काळ उत्तर द्या चर्चा करा, लेखी किंवा तोंडी उत्तर द्या असे सांगत गोंधळ घालू लागले. सरपंच यांनी या तिन्ही आरोपींना तिथे शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी तेही तिघेजण सरपंच घाडीगावकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी फिर्यादी दीनानाथ सावंत हे तेथे बसलेले असताना ते अडवण्यासाठी गेले असता गणेश सावंत याने फिर्यादी यांना तुला मी खल्लास करतो. असे म्हणत खिशातील चाकू काढून डोक्याच्या पाठीमागे भागात जोरदार मारला. या प्रकाराने ग्रामसभेमध्ये एकच गोंधळ झाला. तिथे असलेले अविनाश सावंत, प्रदीप सावंत, सचिन सावंत, रमेश नाटळकर, यांनी येत लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी किशोर परब व महेंद्र गुडेकर हे सोडवायला पुढे आले असता ग्रामपंचायत सदस्य रमाकांत घाडीगावकर, पद्माकर पांगम, सचिन सावंत, अभिषेक सावंत, सुनील जाधव, पंढरीनाथ पांगम, संजय सावंत यांनी किशोर परब व महेंद्र गुडेकर यांना लाथा बुक्क्यांनी व प्लास्टिकच्या खुर्ची ने मारहाण केली. त्यानंतर जखमी तिघांनाही सरपंच, उपसरपंच यांनी सुरुवातीला कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची फिर्याद दीनानाथ सावंत यांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार संशयित आरोपींच्या विरोधात भादवी कलम 307, ३२४, ३२३, 352, 504, 143, 147, 148, 149, बॉम्बे ऍक्ट 37, 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी परस्परविरोधी गटाने देखील कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली असून ही तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.या घटनेमुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी कणकवलीत वातावरण तणावपूर्ण बनले आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी कणकवलीत भेट देत आढावा घेतला. तसेच डी वाय एस पी घनश्याम आढाव व पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी देखील या प्रश्नी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा घेतला. तसेच कणकवली शहरात उद्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने देखील पोलीस बंदोबस्त कार्यरत असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेगडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!