कुडाळ मध्ये न्यू गोल्डन सर्कसचा सर्कसचा शुभारंभ

चित्तथरारक कसरती आणि जोकर्सच्या गमती जमती

मूळ सांगलीचे पण आता कुडाळ भैरववाडी येथील रहिवासी प्रकाश माने यांच्या न्यू गोल्डन सर्कसचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळ मध्ये झाला. चित्तथरारक कसरती आणि त्याला विदूषकांच्या गमतीची जोड यामुळे या सर्कसचा शुभरंभाचा प्रयोग उत्तरोत्तर रंगतच गेला.
कुडाळ गांधी चौक येथे बांदेकर मैदानात न्यू गोल्डन सर्कसचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या हस्ते पूजन करुन आणि फित कापून झाला. शुभारंभ प्रसंगी कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेवक ऍड. राजीव कुडाळकर, विलास कुडाळकर, उदय मांजरेकर, जीवन बांदेकर, नागेश नेमळेकर, सर्कस मालक प्रकाश माने आदी उपस्थित होते.
या सर्कस मध्ये प्रत्यक्ष खेळ सादर करणारे आणि सहाय्यक मिळून 40 कलाकार आहेत. हे कलाकार प बंगाल, आसाम, मेघालय, मणिपूर, केरळ, या राज्यातील आहेत. या कलाकारांनी आकर्षक आणि चित्तथरारक अशा कसरती सादर केल्या. विदुषकानी देखील वेगवेगळ्या गमतीजमती करून रसिकांना मनमुराद हसविले. मृत्यूगोलात मोटारसायकल चालवणे, झुल्यावरच्या कसरती, टांगत्या साडीवरच्या कसरती, नेमबाजी, जगलिंग, सायकलवरील कसरती अशा प्रयोगांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
कुडाळ शहरात रोज सायंकाळी 4 आणि रात्री 7 वाजता असे दोन खेळ आहेत. तसेच शनिवार, रविवार आणि बुधवारी दुपारी एक वाजता जादा खेळ होणार आहेत, अशी माहिती सर्कस मालक प्रकाश माने यांनी दिली.
सर्कसवर आता अनेक बंधने आली आहेत. प्राण्यांचे खेळ दाखवायला बंदी आहे. आतातर झुल्यावरच्या कसरतीवर सुद्धा बंदी आली आहे. मृत्यूगोल मध्ये फक्त एकच मोटारसायकल चालवायला परवानगी आहे. अशा परिस्थितीत केवळ कासरतींवर प्रकाश माने यांनी ही सर्कस सुरू ठेवली आहे.

error: Content is protected !!