कारभार सुधारा.. अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जा !

वारंवार खंडित वीज पुरवठ्यावर मनसे आक्रमक

मनसे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा

प्रतिनिधी । कुडाळ : अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेऊन त्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले. वीज पूर्वतः वेळेत सुरु झाला नाही तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.
गेल्या सात ते आठ दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांची पूर्णतः पोलखोल झालेली दिसून येत आहे आणि याचेच परिणाम म्हणून सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये वारंवार लाईट जाणे, लाईट डीम होणे लोड कमी जास्त होणे असे प्रकार घडत आहेत. यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, जगन्नाथ गावडे, विष्णू मस्के,,दिपक गंगावणे, अतुल पांगुळ,,सोहम कुंभार यांनी महावितरणचे मुख्य अभियंता श्री पाटील यांची भेट घेतली.
शहरात काही मुख्य भाग सोडून तसेच ग्रामीण भागातील गावागावात महावितरण मार्फत मान्सूनपूर्व कामांचा पुरता बोजवारा उडालेला पाहावयास मिळत आहे. याचीच अनुभूती म्हणून वारंवार लाईट जाणे, लाईट डिम होणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी महावितरण मार्फत येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मॉन्सून पूर्व कामे उदा. जीर्ण झालेले पोल बदलणे, निकृष्ट तारा बदलणे, वीज वाहिन्यांवरील वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे या प्रकारची कामे आऊटसोर्सिंग कंपन्या मार्फत पूर्ण करून घ्यावीत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी. असे न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषासोबतच मनसेच्या उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ. .

error: Content is protected !!