घरावर झाडे कोसळून कविलकाटे येथील रमेश जळवी यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वादळी वारा-पावसाचा कुडाळ तालुक्याला जोरदार फटका
प्रतिनिधी | कुडाळ : गुरुवारी रात्री सोसाट्याचे वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पडझड झाली. बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल, विजवाहिन्या, झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत. त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ शहरातील काही भागात लाईट गेली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री.रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर गुरुवारी रात्री ८.३० वाजता भेलड्या माड चे झाड आणि रतांबी (कोकम) झाड पडल्याने रमेश जळवी यांचे मोठे नुकसान झाले आहे.घरावर दोन झाडे पडून सुमारे १ लाख २० हजाराचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी रात्री झालेला जोरदार वारा आणि पाऊस यामुळे मोठा आवाज येत रमेश जळवी त्यांच्या घरावर दोन झाडे कोसळली लगेच घाबरून घरातील सर्व माणसे , लहान मुले यांनी घराचा मागील बाजूने घराबाहेर निघून गेली. त्यामुळे त्यांच्यावर सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.अचानक आलेला वारा,पाऊस यामुळे त्यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर आणि कौलारू छप्पर कोसळून यांचे नुकसान झाले आहे.अचानक घरावर झाडे कोसळल्याने घरातील लहान मुले,महिला घाबरून गेली. आज सकाळपासून त्यांनी त्यांच्या घरावर पडलेली दोन्ही झाडे कोयता, करवतीच्या साहाय्याने तोडून बाजूला केली आहेत. अचानक आलेल्या वारा पाऊस यामुळे जळवी कुटुंबावर हा प्रसंग ओढवला आहे.त्यांच्या घरावर झाडे पडल्यामुळे नुकसान झाले आहे आम्हाला लवकरात – लवकर ही नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जळवी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ,