गेले चार महिने मेडिकल कॉलेजचे कर्मचारी वेतनाविना

रुपेश पावसकर यांचा आंदोलनाचा इशारा

सुमारे साडेचारशे कर्मचाऱ्यांना चार महिने वेतनच नाही

गणेशोत्सव गेला, विजयादशमीचा सण संपला, दिवाळी तोंडावर आली आहे, पण ओरोस इथं असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजच्या सुमारे साडेचारशे कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. त्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत आज निर्णय झाला नाही तर आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दिला आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना चार महिने वेतन न मिळण्याबाबत बोलताना पावसकर म्हणाले, गेले चार दिवस मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे फोन येत आहेत कि जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांचे वेतन त्यांना मिळलेले नाही. कॉलेजचे डीन अमोल शिंदे यांनी देखील हि वस्तुस्थिती मान्य केली. दिवाळी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि चार महिने चारशे ते साडेचारशे कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे. अशा परिस्थितीत ठेकेदार अभिजित भोसले यांनी देखील आपला फोन बंद करून ठेवला आहे.
दरम्यान डीन अमोल शिंदे यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला होता. कर्मचाऱ्यांनी आज दुपारपर्यंत याबाबत निर्णय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान दिवाळी तोंडावर असल्याने आणि या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी याबाबत निर्णय झाला नाही तर या कर्मचाऱ्यांसोबत आंदोलन करण्याचा इशारा रुपेश पावसकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!