चक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात
सलग दुसऱ्या दिवशी पंचनामे करण्याचे काम सुरूच
अपवाद वगळता कृषी विभाग मात्र सुशेगात
कणकवली विभागात महावितरण चे 120 पोल व तारा तुटून तीस लाखाहून अधिक नुकसान
कणकवली तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला आहे. अजून दोन दिवस या नुकसानीच्या पंचनामम्यासाठी जाण्याची शक्यता असून या चक्रीवादळामुळे महावितरणचे कणकवली विभागांमध्ये तब्बल 120 पोल मोडल्याने महावितरण ची 30 लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली. तर तालुक्यातील अनेक गावे सलग दुसऱ्या दिवशी देखील अंधारात आहेत. महावितरणचे कर्मचारी अहोरात्र विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी त्याला सध्या मर्यादा येत आहेत. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठ्यांच्या मार्फत सुरू असून, अपवाद वगळता फळबागा व शेती नुकसानी संदर्भात कृषी विभाग मात्र या नुकसानीच्या पंचनाम्यापासून सुशेगात असल्याची स्थिती दिसत आहे. कणकवली तालुक्यात महसूल विभागाने केलेल्या नुकसानीच्या आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार साकेडी गावामधील 8 घरांचे 3 लाख 34 हजार, हरकुळ बुद्रुक मधील 50 घरे 25 लाख, हळवल मधील 40 घरांचे 18 लाख, कळसुली मधील 20 घरांचे 2 लाख 6 हजार, शेर्पे मध्ये एक व दिगवळे मध्ये एक असे प्रत्येकी एका घराचे 3 हजार प्रमाणे एकूण 6 हजार, शिवडाव मधील नऊ घरे 2 लाख 36 हजार, वागदे मधील एक घर 4 हजार 500, नागवे मधील पाच घरांचे 82 हजार या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून उर्वरित पंचनामेची कामे पुढील दोन दिवस चालणार आहेत. याबाबत नियमित तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. महसूल विभागाचे कर्मचारी अहोरात्र पंचनामे करिता प्रयत्न करत असताना कृषी विभागाचे अपवाद वगळता कृषी सहाय्यक मात्र सुशेगात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. कृषी विभागाशी संदर्भित देखील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले असून याकरता कृषी सहाय्यकाने गावागावात शेतकऱ्यांच्या भेटी घेणे गरजेचे होते. मात्र काही कृषी सहाय्यक हे फक्त नावापुरतेच टोपली टाकण्याचे काम सध्या करत असल्याचे दिसून येत आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली