कणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
योग्य मदत न मिळाल्यास शिवसेना आंदोलन करणार
कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक,हळवल, कळसुली, शिरवल, साकेडी यांसह तालुक्यातील काही गावांमध्ये काल चक्रीवादळ होऊन ग्रामस्थांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले. हरकुळ बुद्रुक मध्ये ७५ घरांची छप्परे जमीनदोस्त झाली आहेत. प्रशासनाकडून त्याची पंचयादी घालण्याचे काम चालू आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हरकूळ बु. सरपंच बंडू ठाकूर आणि मी स्वतः जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. तौकते चक्रीवादळात झालेल्या नुकसानी पेक्षा जास्त नुकसान या अचानक आलेल्या चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे तौक्ते वादळ निकषांपेक्षा जादाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नुकसान भरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवू असे सांगितले.खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आज नुकसान ग्रस्तांना घरपोच पत्रे व कौले मदत स्वरूपात दिले जाणार आहेत. अशी माहिती शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.
कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हरकूळ बु. सरपंच बंडू ठाकूर, ग्रा. प. सदस्य नित्यानंद चिंदरकर, हळवल ग्रा. प सदस्य अनंत राणे, ग्रा. प सदस्य रोहित राणे उपस्थित होते.
सतीश सावंत पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी हरकूळ गावाला भेट देऊन पाहणी केली जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खासदार विनायक राऊत यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला असून त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करून तौकते वादळापेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या चार पाच दिवसात शासनाने प्राथमिक स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी अशीहि मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. अन्यथा जे जे लोक बाधित झालेत त्यांना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल. लोकांनी आपली घरे कर्जे घेवून किंवा हात उसने पैसे घेवून बांधली आहेत. नैसर्गिक आपत्तीत घरांचे नुकसान झाल्याने शासनाने सहानभूती पूर्वक विचार करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही करत आहोत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नुकसान भरपाई मिळावी,यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
आपल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी नुकसान ग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. महसुलची प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहून काम करत आहे. हरकूळ मध्ये ८५ विद्युत पोल जमीन दोस्त झाले आहेत.महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची आम्ही भेट घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. महावितरणच्या आज ४ टीम हरकूळ गावात काम करत आहेत. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी व आम्ही सर्वानीच प्रशासकीय यंत्रणेला केलेल्या सूचनेनुसार सर्वच यंत्रणा योग्य प्रकारे हरकूळ गावात सहकार्य करत आहेत.इतर ठिकाणी देखील नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत त्या अधिकारी कर्मचारी यांचे सतीश सावंत यांनी आभार व्यक्त केले. या संकटाच्या काळात राजकारण न करता प्रत्येक राजकीय पक्षाची नुकसान ग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी आहे. जे जे कोणी मदत करतील त्यांचे आम्ही आभार मानतो असे सतीश सावंत यांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर कणकवली