कणकवली तालुक्यातील शेर्पे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

निवडणूक वादातून भाजपा पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर
आमच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाल तर याद राखा जशास तसे उत्तर देऊ, सुशांत नाईक!
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक साठी मतदान संपल्यावर सिंधुदुर्गात कणकवली तालुक्यात भाजपा व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत ठाकरे गटाच्या माजी सरपंचाला भाजपाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडल्याने या निवडणुकीला गालबोट लागले आहे. खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाळा राऊत यांना आज सायं.६.२० वाजता भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी माहिती श्री राऊत यांनी दिली. त्यामुळे त्यांना तातडीने खारेपाटण प्रा .आ.केंद्रात दाखल करण्यात आले असून खारेपाटण विभागात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गोट्या कोळसुलकर, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी खारेपाटण येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले होते.
याबाबत आधिक वृत्त असे शेर्पे निवडणूक मतदान सायंकाळी ६.०० पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते श्री बाळा राऊत हे शेर्पे दुकान येथे बसले असता अचानक ६.२० च्या दरम्यान दोन गाड्या भरून कार्यकर्ते आले व त्यांनी काही समजण्याच्या आत लाथा बुक्यानी व दांडयांनी मारहाण करून जीवे मरण्याची धमकी दिली असल्याचे जखमी शिवसैनिक श्री बाळा राऊत यांनी सांगितले. तर भाजप पक्षाचे कार्यकर्ते श्री बाळा जठार व दिलीप तळेकर ,नाना शेट्ये यांसह भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे यावेळी बाळा राऊत यांनी सांगितले.
दरम्यान आमच्या कार्यकर्त्याला. मारहाण करणाऱ्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिला. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला गेलात तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.
कणकवली /प्रतिनिधी





