मतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज

मतदान साहित्य घेऊन ९१८ केंद्रांवर कर्मचारी रवाना

सर्वानी मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

निलेश जोशी । सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांची सांगितले आहे. आज सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली मतदार संघातून निवडणूक कर्मचारी जिल्ह्यातील ९१८ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन व इतर मतदान सामुग्री घेऊन रवाना झाले. त्यासाठी कणकवली,कुडाळ आणि सावंतवाडी येथे एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकूण ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्‍येने आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. जिल्ह्यातल्या ९१८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यासाठी १२७ सेक्टर अधिकारी आणि पोलिस सेक्टर अधिकारी मतदान केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था पाहणार आहेत. ४५९ मतदान केंद्रावर वेब कास्टींगच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. ९२ मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक असणार आहेत. मतदान केंद्रावर उन्‍हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्‍यात आली असून पिण्‍याच्‍या पाण्‍यासह आवश्‍यकतेनुसार आरोग्‍य विषयक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत.
जिल्ह्यातील ९१८ मतदान केंद्रावर एकूण ३ हजार ७६४ निवडणूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त ३८६ कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत असे एकूण ४ हजार १५० निवडणूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आज हे कर्मचारी कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी येथून निवडणूक साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. त्यासाठी एसटीच्या १२० बसेस तैनात ठेंवण्यात आल्या होत्या. तसेच १८१ चारचाकी गाड्यातून अधिकारी मार्गस्थ झाले.

पोलीस प्रशासन सज्ज

जिल्ह्यात उद्या ७ मे रोजी मतदान होत आहे. त्यासही कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये १७१ पोलिस अधिकारी, २ हजार ४२ पोलिस अंमलदार, ८८१ होमगार्ड, सीएपीएफची १ कंपनी , एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एक क्युआरटी तैनात करण्यात आलेल्या आहेत.

निलेश जोशी , कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!