आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ नये : उमेश गाळवणकर

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : मनाच्या निरोगी आयुष्याबरोबरच शरीर निरोगी असणं हे फार महत्त्वाचे आहे; आपल्यातील उत्तमाचा ,कला कौशल्यांचा या क्रीडा महोत्सवामध्ये कस लागून यश संपादन करा. मात्र आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ देऊ नका. असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले. बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.


कुडाळ येथील बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सवाच शुभारंभ संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून व श्रीफळ वाढवून संपन्न झाला. यावेळी त्यांच्यासोबत फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला,, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, उप प्राचार्य विभा वझे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, जुनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर उपस्थित होते.


निरोगी शरीराच्या जडणघडणीसाठी निर्मळ मनाचा विकास झाला पाहिजे. सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत.त्याचा यथोचित उपयोग करून घ्यावा असे सांगत उमेश गाळवणकर या क्रीडा महोत्सवास शुभेच्छा दिल्या. खिलाडूवृत्तीने खेळ खेळा, विजयी होताना यशाची धुंदी चढू देऊ नका व इथल्या स्पर्धातील रागलोभ, ईर्षा मैदानातच ठेवून पुन्हा एकोप्याने शैक्षणिक जीवन यशस्वी करा .अशा शब्धात बॅ. नाथ पै महिला/ रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अरुण मर्गज यांनी क्रीडा महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
कोकण विभागामध्ये एकमेव असलेल्या या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये पन्नास मीटर धावणे, 100 मीटर धावणे, थाळीफेक गोळा फेक, थ्रो बॉल ,क्रिकेट, लांब उडी अशा विविध खेळांचा समावेश असलेल्या क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांनी अतिशय खिलाडूवृत्तीने एन्जॉय केला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक डॉ.सुरज शुक्ला यांनी केले तर सूत्रसंचालन मृण्मयी खानविलकर यांनी केले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!