अभाअनिसने जिल्ह्यात प्रथमच जटामुक्त केली एक मुलगी

वेंगुर्ला – अखिल भारतीयअंधश्रद्धा निमूर्लन समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील एका मुलीला जटामुक्त करून नवीन जीवन दिले . .
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा महिला संघटीका व साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील हिच्याकडे जिल्हयातील एका गावातील नाव बदलून अनामिका या एकंवीस वर्षीय तरुणीच्या केसामध्ये जटा झाल्या असून तिला त्याचे ओझे सहन करणे शक्य होत नाही . तसेच झोपताही येत नाही , जटांच्या ओझ्याने मान प्रचंड दुखत होती.एवढेच नव्हे तर कॉलेजमध्ये ही वावरणे तिला असहय झाल्याचे सांगून यातून मार्ग काढण्याची विनंती केली . तिच्या पालकांना सदरची जटा देवीची असून काढल्यास त्रास तिला व घरच्यांनाही होईल असे काहींनी सांगितल्याने पालकांनी देवाना कौल लावणे , उपास तापास करणे इत्यादी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी हि घटना रुपाली पाटील यांनी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्या कानावर घातल्याने त्यांनी त्यांच्या पालकांची जिल्हा उपाध्यक्ष डॉ . संजिव लिंगवत , वेंगुर्ला तालुका संपर्क प्रमुख स्मिता गावडे , जिल्हा महिला संघटिका रुपाली पाटील आदींच्या समवेत पालक व संबंधित मुलीचे समुपदेशन करण्यासाठी भेट घेतली .केसात जटा का होतात ? त्याची कारणं त्यांना पटवून देण्यात आली . केसात जटा होणे म्हणजे दैवी कोप किंवा करणीमुळे अथवा वाईट शक्तीमुळे होत नाही हे त्यांना पटवून देण्यात आले .
मुलीच्या पालकांची तसेच मुलीची मानसिक तयारी जटा काढण्याची झाल्या नंतरच शिरोडा येथील त्वचारोग तज्ञ डॉ . किरण नाबर यांची मदत व त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले . त्यांनी केलेल्या वैद्यकिय उपचारानंतरच सदरच्या मुलीच्या केसातील जटा मुलीच्या व पालकांच्या संमतीनेच काढण्यात आली .
यावेळी वैद्यकिय उपचारा वेळी डॉ . संजीव लिंगवत , रुपाली पाटील , डॉ सई लिंगवत, स्मिता गावडे व पालक व त्यांचे हितचिंतक उपस्थित होते .
जटामुक्त झाल्यानंतर मुलींच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता .
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गने प्रथमच अनामिका या एका मुलीला जटामुक्त जीवन जगण्यास आणि सर्वसामान्यासारखे जीवन जगण्यासाठी सहकार्य केल्याबद्ल आणि वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण औषध पाण्यापासूनचा खर्च केल्याबद्ल पालकांनी डाँक्टरांचे व समितीचे आभार मानले . डाँक्टरांनीही सेवा भावी वृत्तीने फीही घेण्यास नकार दिला . जिल्ह्यामध्ये अशा महिला अथवा पुरुष जटाधारी असल्यास त्यांच्या पालकांनी समितीशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हासंघटक विजय चौकेकर यांनी केले आहे .