नवोदय विद्यालय सांगेली;मुख्यमंत्री कार्यालयाकडूनगंभीर दखल

सांगेली केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश शिक्षण खात्याला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे.
पीएम श्री केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली-सिंधुदुर्ग येथे इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत 438 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यालय निवासी असून दि. 7 मार्च रोजीच्या रात्रीच्या जेवणातून 160 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाली आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासन व नवोदय समितीकडून सुरू असलेली चौकशी संशयास्पद आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाकडे त्वरित गांभिर्याने लक्ष द्यावे व या प्रकरणाची एसआयटी अथवा त्रयस्त समितीमार्फत चौकशी करून यातील सर्व दोषींवर कारवाई करून तिथे असलेल्या मुलांच्या जीविताच्या रक्षणासाठी सर्वतोपरी कायमस्वरुपी उपाय करावेत.
विद्यालय प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात यापूर्वी अनेकदा अनेक सरकारी, प्रशासकीय पातळीवर निवेदने देऊनही त्याची योग्य ती दखल जिल्हाधिकारी तथा नवोदय विद्यालयाचे अध्यक्षांनी घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांवर कारवाई करण्यासोबतच सर्व दोषींवर दाखल करण्यात आलेल्या भादंवि संहिता कलमांसह भादंवि संहिता कलम 328 अन्वयेसह बाल हक्क संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून भविष्यातील धोका टाळावा, अशी मागणी पालक दीपक जाधव, प्रवीण पाताडे, समाधान जठार, नीलेश गावकर, डॉ. वैभव आईर, गौरी गोवासी, श्रेया धावळे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण खात्याला दिले आहेत.

बाल हक्क आयोगाकडे मागितली दाद
सांगेली नवोदय विद्यालयात घडलेल्या अन्न विषबाधा प्रकरणी पालकांनी बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. अशा गंभीर प्रकरणात प्रशासनाने केलेल्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त करताना आपण या स्वत: लक्ष घालू असे आश्वासन आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी दिले आहे.

सावंतवाडी : प्रतिनिधी

error: Content is protected !!