गारगोटीच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचा सिंधुदुर्गात सावळा गोंधळ

कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात अनेक त्रुटी

प्रशिक्षणार्थींच्या सह्या घेतल्याशिवाय प्रशिक्षण सुरू

सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट अध्यक्ष यांना ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्या माध्यमातून कणकवली आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात गारगोटीच्या प्रशिक्षण केंद्राचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या प्रशिक्षणाकरिता एकूण 45 प्रशिक्षणार्थींची संख्या निश्चित करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या सावळ्या गोंधळामुळे अवघे 22 प्रशिक्षणार्थीच या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले. त्यातच कणकवली पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण स्थळ बदलून कणकवलीतील शिवशक्ती हॉल या ठिकाणी घेण्यात आले. मात्र या ठिकाणी प्रशिक्षणार्थींची कोणतीही व्यवस्था नसल्याने तसेच प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षण देणारे संबंधित संस्थेचे तज्ञ अधिकारी यांच्यात संवाद साधण्यासाठी हॉलमध्ये स्पीकर, माईक ची व्यवस्था नव्हती. त्यातच प्रशिक्षणा करिता उपस्थित असलेल्या तिन्ही उपस्थित तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण करिता उपस्थित प्रशिक्षणार्थांच्या उपस्थितीच्या सह्या देखील घेण्यात आल्या नाहीत. याबाबत प्रशिक्षणार्थींकडून विचारणा केली असता सह्या लवकर घेतो असे सांगून वेळकाढू भूमिका घेण्यात आली. त्यामुळे हे प्रशिक्षण वर्ग हे निव्वळ सावळ्या गोंधळाचेच उदाहरण नव्हे का? दरम्यान याबाबत कणकवली गटविकास अधिकाऱ्यांनी देखील या सावळ्या गोंधळाबाबत कानावर हात घेतले असून, याची जबाबदारी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्यावर ढकलण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणा वर्गाच्या पहिल्या दिवशी हा सावळा गोंधळ उडाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासंदर्भात लक्ष देणार का? असा सवाल प्रशिक्षणार्थी मधून उपस्थित केला जात आहे. हे निवासी प्रशिक्षण असताना या ठिकाणी प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या पाण्यापासून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शासनाकडून या प्रशिक्षण वर्गांकरीचा कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जात असताना हा निधी नेमका जातो कुठे? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!