आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा – डॉ. व्ही. बी. झोडगे

एसआरएम कॉलेज आणि महिला रुग्णालय तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

निलेश जोशी । कुडाळ : जीवनशैली बदलल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे ठरते. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. म्हणूनच शासनाच्या विविध योजनांमुळे शक्य झालेल्या अशा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.बी. झोडगे यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि जिल्हा महिला आणि बी बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते आज बोलत होते.
कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ एस एस कुलकर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही बी झोडगे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना डॉ कुलकर्णी म्हणाल्या की आपण जो आहार घेतो तो प्रत्येक वेळी निर्धोक आणि सुरक्षित असेलच असे नाही. रासायनिक खते, कीटक नाशकांचा अवैज्ञानिक वापर, चुकीच्या साठवणूक पद्धती इत्यादी कारणांमुळे अन्न सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे निर्व्यसनी लोकांना सुद्धा आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नियमितपणे वेळच्या वेळी आरोग्याची तपासणी करून घेणे आणि आहार विहाराचे नियम पाळणे हितावह ठरते.
डॉ व्ही बी झोडगे म्हणाले की पूर्वी माणसाची जीवनशैली आरोग्यदायी असली तरी आता सारख्या आरोग्य सुविधा आणि औषधोपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुर्मान कमी होते. आता वैज्ञानिक प्रगतीमुळे आरोग्य आणि औषधोपचार सुविधा वाढल्या. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. असे असले तरी जीवनशैली बदलल्या मुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे ठरते. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे शक्य झालेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत, आभार आणि सूत्र संचालन, प्रा डॉ रविंद्र ठाकूर यांनी केले. महाविद्यालयातील आयक्यूएसी विभाग प्रमुख डॉ रविंद्र ठाकूर आणि स्टाफ वेल्फेअर विभाग प्रमुख डॉ व्हीं जी भास्कर यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!