गोपाळ सेवा दाता जिल्हा बँकेचा दुवा बनावा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन
जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला दिशा देण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने केलेले असून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी गोपाळ सेवा दाता यांनी बँकेचा दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील प्रशिक्षित गोपाळ सेवादाता यांना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, गोकुळ दुध संघ, कोल्हापुर व भगिरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने द्रवनत्र कंटेनर व कृत्रिम रेतनासाठी लागणारे आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम भगिरथ प्रतिष्ठान, झाराप येथील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मार्गदर्शनात्मक प्रास्ताविकात भगिरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. प्रसाद देवधर यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले तर गोपाळ सेवादाता म्हणून काम करत असतांना उद्भवणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय व विविध अडचणी बाबत जि. प. पशुधन विकास अधिकारी डॉ. तुषार वेर्लेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गोपाळ सेवादाता यांनी जिल्ह्यात ए.आय. वर्कर म्हणून काम करीत असतांना आलेले आपले अनुभव प्रतिनिधीक स्वरुपात मांडले.
यावेळी बोलतांना जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी म्हणाले कि, गोपाळ सेवा दाता यांनी दुग्ध संस्थेचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे. जिल्हा बँकेने येत्या पाच वर्षात प्रतिदिन १ लाख लिटर दुध संकलन निर्मितीचे उद्दीष्ट्य ठेवलेले असून त्याच्या पुर्ततेसाठी आपणा सर्वांचा सक्रीय सहभाग असला पाहीजे. पशुपालन व्यवसायात केवळ वित्तपुरवठा करुन दुग्ध उत्पादकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते व यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना लागणारी मदत जिल्हा बँक करणार आहे. यापुढच्या काळात दुध संकलन आणि दुधाची निर्मिती व त्यातुन मिळणारा नफा यापुरता विचार न करता शेती व्यवसाय करत असतांना आपण शेतीपुरक व्यवसायाला हळुहळु कृषी पर्यटनाची जोड दिली तर आपल्याकडचा शेतकरी सक्षम होणार असून आपण यात निश्चितपणे यशस्वी होऊ असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी भगिरथ प्रतिष्ठान चे डॉ. प्रसाद देवधर, गोकुळ दुध संघ, कोल्हापुर चे डॉ. नितीन रेडकर, डॉ. शिखरे, माऊली दुग्ध सोसायटी, मडुरा चे श्री. ज्ञानेश परब, नेरुर दुग्ध सोसायटीचे श्री. मनोहर दळवी, जि. प. पशुधन विकास अधिकारी डॉ. तुषार वेर्लेकर, श्री. नारायण गावडे, दुग्ध संस्थचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील गोपाळ सेवा दाता लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नवीन मालवणकर यांनी केले.
झाराप प्रतिनिधी