संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा
निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी विभागाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए च्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून सादरीकरण केले. राजस्थानी, मारवाडी, बंगाली उर्दू, हिंदी मालवणी ,कोकणी, सातारी पुणेरी अशा मातृभाषाआणि मायबोलींमधून या विद्यार्थ्यांनी लोककथा, लोकगीते काही प्रसंग, आठवणी यांचे सादरीकरण केले. या सर्वांचा अनुवाद मराठी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सादर केला.
डाॅ. शरयू आसोलकर यांनी मातृभाषेचे महत्त्व विशद केले. आपली मातृभाषा आपल्याला जगाशी जोडून देत असते. तिला जपून तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मातृभाषेमध्ये लिहिणे बोलणे व्यवहार करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी आवर्जून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. व्ही.जी. भास्कर यांनीही विचार मांडले. अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.बी. झोडगे यांनी यांनी मातृभाषा ही आपली ओळख असून तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमांमध्ये लक्ष्मी राठोड, चेतना राठोड ,गंधाली हडकर ,रसिका म्हापसेकर ,मानसी भागवत, सुवर्णा देसाई, ऋतुजा परुळेकर, ऋग्वेदा पराडकर ,गणेश सालमटप्पे ,हार्दिक कदम, प्रचिती सोनवडेकर यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत मराठी विभाग प्रमुख डॉ.शरयू आसोलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही बी. झोडगे उपस्थित होते. प्रा. संतोष वालावलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.