सिंधुदुर्ग हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा – रुणाल मुल्ला

कुडाळ येथे चर्मकार समाज गौरव सोहळा संपन्न
दिनदर्शिका प्रकाशन, गुणगौरव सोहळा
प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा आहे. आजची तरुण पिढी येथील दशावतार लोककला पुरातन कला जोपासून वाटचाल करत आहेत हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कुडाळ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी केले. चर्मकार समाजाच्या गौरव सोहळा कार्यक्रमात त्या कुडाळ येथे बोलत होत्या.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग, तालुका शाखा कुडाळ यांच्या वतीने सन २०२४ ची दिनदर्शिका प्रकाशन तसेच यशस्वी उद्योजक व नामवंत युवा कलाकार यांचा सत्कार सोहळा मराठा समाज हॉल, कुडाळ,येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष शाखा-कुडाळ अध्यक्ष समाजभूषण मनोहर सरमळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन पोलिस निरीक्षक श्रीम. रुणाल मुल्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, माजी गटविकास अधिकारी तथा जेष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण, सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशन अध्यक्ष मनोहर आंबेकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, प्रवक्ते के टी चव्हाण, उद्योजक रामदास चव्हाण, सुभाष बांबुळकर, सौ. कावेरी चव्हाण – श्रीराम चव्हाण, सुरेश पवार, राजन वालावलकर, रत्नदीप चव्हाण, मधुकर चव्हाण, संतोष चव्हाण, सोनाली चव्हाण,.गणपत चव्हाण, प्रा नितीन बाबर्डेकर, महानंद चव्हाण, केशव चव्हाण, समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव तसेच आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. .
यावेळी बोलताना श्रीमती मुल्ला म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ हे समाजासाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवित आहे. त्यावेळची समाज परिस्थिती व आताची पाहता ज्यांच्यामुळे आपण घडत आहोत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. आपल्याला पाश्चिमात्य संस्कृती अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसते. मात्र सिंधुदूर्ग जिल्ह्यातील संस्कृती ही विविध लोककला जोपासणारी आहे हे विशेष आहे. ही कला इतिहास पुढे आणण्यासाठी या क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला समाज खूप चांगले काम करत आहे. तरुण पिढीला या प्रवाहात आणण्यासाठी काम करीत आहे असे सांगत तुम्ही माझ्या कार्याचा जो गौरव केला तो आमच्यासाठी उर्जा देणारा आहे असे सांगितले.
आपल्या समाजाचे स्वप्न संत रविदास भवन कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे साकारणार आहे. काम अंतिम टप्प्यात असून यासाठी खासदार विनायक राऊत यांनी 15 लाखाचा निधी दिला आहे. तसेच समाजाची कुडाळ शाखा गेली चार वर्षे दिनदर्शिका प्रकाशन उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यात समाजाचे कार्यक्रम कसे करावे याचा आदर्श कुडाळ तालुका असल्याचे जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांनी सांगितले.
समाजभूषण मनोहर सरमळकर यांनी आपण अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्वांच्या सहकार्याने सामाजिक शैक्षणिक जे काही उपक्रम राबविले त्याचा धावता आढावा घेतला. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांना समाजाच्या माध्ममातून प्रोत्साहन दिले. तुम्हा सर्वाची दोन वर्षे अतिशय चागली साथ मिळाल्याचे सांगून यापुढे ही संघटीतपणे समाजाच्या विकासाची कास धरुया असे सांगितले
सेन्सॉर बोर्ड सदस्य विजय चव्हाण यांनी कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना जिद्द चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वास सोबत बाळगा यश निश्चितच आहे. आपल्या जिल्हाची सांस्कृतिक चळवळ अधिक जोमाने वृध्दिंगत झाली पाहिजे यासाठी मी काम करणार आहे. तुमच्यासाठी सांस्कृतिक चळवळीत जे जे सहकार्य लाभेल ते करण्यासाठी मी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी श्री आंबेकर, श्री पाताडे, श्री ओटवणेकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी दशावतार कलाकार उद्योजक यांचा शाल श्रीफळ मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला दिनदर्शिका अहवाल वाचन श्रीराम चव्हाण व रत्नदीप चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन प्रा नितीन बाबर्डेकर यांनी केले आभार मधूकर चव्हाण यांनी मानले
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.