रंगकर्मींनी केला दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार

तेंडोलकर यांना राज्य शासनाचा कला रजनी लोककला पुरस्कार झाला आहे जाहीर
निलेश जोशी । कुडाळ : राज्य शासनाच्या कला रजनी लोककला पुरस्कारात माझ्या जिल्ह्याच्या योगदानाबरोबरच माझे सर्व दशावतार बांधव व अलोट नाट्यप्रेमीचा सहभाग आहे सातासमुद्रापार पोचलेली आपली दशावतार लोककला अजुन वृद्धीगत करण्यासाठी माझा निश्चितच प्रयत्न राहील असे प्रतिपादन दशावरातातील भीष्माचार्य यशवंत तेंडोलकर यांनी केले त्यांच्या तेंडोली निवासस्थानी जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यकर्मी यांच्या वतीने त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत सन्मान करण्यात आला
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य सांस्कृतिक कलारजनी पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली- हुडकुंभावाडी येथील दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ कलाकार यशवंत (काका) तेंडोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचा जेष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर, सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जेष्ठ नाट्यकर्मी तथा अक्षरसिंधू नाट्य संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष प्रा हरिभाऊ भिसे, कथक विशारद पदवी प्राप्त नृत्यांगना मृणाल सावंत यांनी श्री. तेंडोलकर यांच्या तेंडोली येथील निवासस्थानी भेट देऊन शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान केला. यावेळी सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, ,कौशल राऊळ,मीनाक्षी वेंगुर्लेकर, साक्षी राऊळ सुवर्णा तेंडोलकर ग्रामसेवक आत्माराम परब आदी उपस्थित होते
श्री तेंडोलकर म्हणाले त्यावेळी दशावतार प्रवास हा अतिशय खडतर होता. त्यावेळी कोणतीही दळणवळणाची साधने नसल्याने डोक्यावर बोजा घेऊन कड्याकपारीतून वाटचाल करून ही कला जिवंत ठेवली. आता प्रत्येक मंडळाकडे गाड्या आल्या त्यावेळी जो संघटीतपणा होता तो आता राहिलेला नाही. हा संघटितपणा टिकवून राहण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. युवा कलाकार आज या लोककलेला पुढे नेत आहेत. मी या कलेसाठी काय केले असे म्हटले तर आता जर शंभर कलाकार असतील त्यामध्ये माझे सत्तर शिष्य असून त्यामध्ये लोकराजा कै सुधीर कलिंगण हा माझाच शिष्य होता. ट्रीकसिनची पहिली सुरुवात मी केली २५ वर्षापूर्वी सर्वप्रथम मी माझ्या गावात सर्वांच्या सहकार्याने संयुक्त दशावतार केला. त्याची फलश्रुती आज आपल्याला पाहायला मिळते. सहा महिने संयुक्त दशावतार व सहा महिने पारंपरिक दशावतार चालत आहे हे मी दिलेले योगदान आहे आणि त्याचे फळ मला परमेश्वराने दिले आहे. युवा कलाकारांनी संघटीत झाले पाहिजे शिकले पाहिजे. असे श्री. तेंडोलकर यांनी सांगितले.
अजूनही दशावतार लोककलेवर पुस्तक निघाले नाही. या कलेवर पुस्तक झाले पाहिजे. युवा पिढीने जेष्ठ कलावंताच्या मार्गदर्शनाखाली ही लोककला पुढे नेली पाहिजे. नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत असे सांगत माझ्या नाट्यप्रवासाची सुरुवात माझ्या गावातील अमरकला दशावतार नाट्यमंडळातून झाली. अनेक दशावतार नाट्यमंडळात कामे केली. काही दशावतार मंडळे चालविली. जेष्ठ लोककलाकार कै बाबी कलिंगण यांच्यासमवेतही मी काम केले आहे यांची आठवण सुद्धा श्री. तेंडोलकर यांनी सांगितली.
विजय चव्हाण म्हणाले, काका तेंडोलकर यांची दशावतारमधील भीष्माचार्य म्हणून ओळख आहे. त्यांना राज्य शासनाचा दशावतार लोककलेतील मिळालेला पुरस्कार हा आम्हा सर्वांसाठी उर्जा निर्माण करणारा आहे. या लोककलेला पुढे नेण्यासाठी व जिल्ह्यातील सर्व नाट्यमंडळे संघटीत होण्यासाठी भविष्यात तुमचे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार आहे असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळ अशीच मोठी करा, असे आवाहन केले.
श्री. तेंडोलकर यांनी त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीचा त्यांनी सामना करीत या कलेत लौकिक प्राप्त केला. दशावतारातील अनेक विनोदी भूमिका त्यांनी साकारल्या. गेली अनेक वर्षे ते दशावतार कला जोपासत आहेत. भीष्म, दक्ष, विश्वामित्र, विनोदी ब्राह्मण अशा विविध ढंगी, विविध अंगी भूमिका साकारत त्या अजरामर केल्या आणि आजही सत्तरीच्या दारातही त्याच जोशात भूमिका साकारत आहेत. संयुक्त दशावतार संचात ते काम करतात. त्यांनी अनेक पौराणिक व काल्पनिक कथानके लिहिली आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.