शिक्षणातील नवीन बदलांचा अभ्यासपूर्णपणे स्वीकार करा : उमेश गाळवणकर
बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत एम.ए. शिक्षणशास्त्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी : कुडाळ : बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात जे बदल होत आहेत त्या बदलाचा, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. पैशाच्या श्रीमंती बरोबर वैचारिक श्रीमंती ही वाढवा. पदवी माणसाला पदोन्नतीचे फायदे देईल; पण त्याचबरोबर ज्ञानाची उन्नती करणे गरजेचे आहे .कारण ज्ञानाने अद्यावत असणाऱ्या विद्यार्थ्यांची फौज आता तयार होत आहे .त्यांना सामोरे जायचं असेल तर आपणही त्यासाठी तयार असलं पाहिजे. असे प्रतिपादन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले. बॅ.नाथ पै बी.एड. कॉलेजमध्ये आयोजित एम ए शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या या एम ए.शिक्षणक्रमाच्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष मिळून 110 विद्यार्थी सहभागी झाले होते.
एम ए शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाची सुरुवात मानवारांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या तर्फे ईशस्तवन व स्वागत सादर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बॅ.नाथ पै बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख परेश धावडे, केंद्र समन्वयक नितीन बांबर्डेकर,बॅ.नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज ,समंत्रक डॉ.दिपाली काजरेकर, डॉ .मनोज रेडकर, डॉ .सतीश तेरसे,प्रा. नागेश कदम,प्रा. योगिता शिरसाट, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, गोविंद चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गाळवणकर पुढे म्हणाले, नवीन बदलांचा परिणाम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक हा फार महत्त्वाचा दुवा आहे .समाजाच्या वेदना समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी पहिली सुरुवात शिक्षण व्यवस्थेतून होते. त्यामुळे वेदनांची, माणसांची जीवनपद्धती जाणून घ्या. ती दूर करण्याचा प्रयत्न करा .माणसाने माणसाशी माणसासम वागणे याचा कृतीशील अनुभव समाजाला द्या . आणि उर्वरित जीवन छानपणे जगण्यासाठी प्रयत्नरत रहा. आपल्याकडे जे आहे ते विकसित करा. मुखवटे घालून जास्त काळ आनंदाने जगता येत नाही. याचं भान ठेवून सत्य व प्रामाणिकपणे, सनदशीर मार्गांचा अवलंब करा. .जीवन जगत असताना येणाऱ्या समस्यावर मात करण्यासाठी बोलते व्हा संवाद साधा. कारण आपल्या सोबत आपली माणस आहेत यासारखी श्रीमंती नाही. .ती श्रीमंती वाढवा. एम .ए. एज्युकेशन सारख्या आपल्या शैक्षणिक ज्ञानांमध्ये भर घालणाऱ्या पदवीसाठी आपण शिक्षण घेत आहात .ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे असे सांगून विद्यार्थ्यंना भविष्यातील शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ.दिपाली काजरेकर यांनी ‘एकंदर या अभ्यासक्रमाचे महत्त्व तसेच अभ्यासक्रम परिपूर्ण करण्यासाठी विचारांच्या बैठकीचे असलेले महत्त्व कथन करीत; आपले काम प्रामाणिकपणे करा. त्यातून जो मिळणारा आनंद असतो अद्भुत असतो.मी काय करतो याची जाणीव ठेवून काम करा. आलेल्या संधी आपल्या व्यक्तिमत्व बदलासाठी कशा उपयुक्त ठरतील याचा अभ्यास करा.उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेसारखी संस्था आपल्या पाठीशी आहे .त्याचा यथोचित उपयोग करून घ्या .असे सांगत प्रशिक्षणार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
केंद्रप्रमुख परेश धावडे यांनी शिक्षण व्यवस्थेतील नवीन तंत्रज्ञाना चा नवीन बदलांचा स्वीकार करून आपलं ज्ञान अपडेट करा. असे सांगत अतिशय उत्तम खेळमेळीच्या वातावरणात हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर या शिक्षणक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हरहुन्नरी केंद्र समन्वयक प्रा.नितीन बांबर्डेकर यांनी सुद्धा अतिशय कार्यतत्परतेने या कार्यशाळेमध्ये शिक्षक सहभागी झालेले होते त्यांचे कौतुक करत त्यानी केलेले उपक्रम, परिपाठ ,संशोधन आराखडा व समंत्रकांनी केलेल्या यथोचित मार्गदर्शनाचा प्रशिक्षणार्थ्यांनी केलेला उचित उपयोग याचं कौतुक केले .
प्रशिक्षण कार्यशाळेतील उत्तम प्रशिक्षणार्थी व उत्तम गट यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने गोविंद चव्हाण ,प्राची दळवी, गुरुनाथ ताम्हणकर, ऐश्वर्या कुडतडकर, सुषमा मांजरेकर यांनी आपले मनोगत सादर करताना, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने एक सुंदर परिसर व एक सुंदर आवार उपलब्ध करून व आपली सुंदर व्यवस्था केली याबद्दल संस्था आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल समंत्रक यासर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी शिक्षकांपैकी सौ. स्वाती पाटील यांनी केले , प्रस्ताविक नारायण नाईक यांनी तर उपस्थितांचे आभार सौ .सुरेखा परब यांनी मांनले
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.