मान्यवरांच्या हस्ते कुडाळ पंचायत समिती सन्मानित
कुडाळ पंचायत समितीला मानाचा तिहेरी मुकुट प्रदान
महाआवास योजनित सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम
प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचा तिहेरी मुकुट प्राप्त केलेल्या कुडाळ पंचायत समितीला मुंबई येथे गुरुवारी सायकाळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्यासह तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण आणि सहकाऱ्यांनी स्वीकारला. श्री. चव्हाण कारकिर्दीत झालेल्या या पुरस्कारामुळे या योजनेत दुसऱ्यांदा सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे
राज्यात 20 नोव्हेंबर 2023 ते दि. 31 मार्च 2024 या कालावधीत ‘महा आवास अभियान 2023-24 राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा शुभारंभ गुरुवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पंचायतराज तसेच इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरीयम, जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. .सदर कार्यक्रमा दरम्यान ‘महा आवास अभियान- 2021-22 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाआवास अभियान 21- 22 मध्ये पंतप्रधान आवास योजना व राज्यस्तरीय पुरस्कृत आवास योजनेमध्ये कुडाळ पंचायत समितीने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट ठरत प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्य पुरस्कृत योजनेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. डाटा ऑपरेटर म्हणून सानिका चव्हाण यांना पुरस्कार मिळाला आहे. हा मानाचा तिहेरी मुकुट कुडाळ पंचायत समितीने प्राप्त केला आहे.
राज्यात महाआवास योजना 20- 21 मध्ये सुरू झाली त्यावेळी सुद्धा कुडाळ पंचायत समितीने तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी व त्यांच्या टीमने देदिप्यमान यश मिळविले होते. यामध्ये कुडाळ पंचायत समिती कोंकण विभागात प्रथम आली होती तर कुडाळ तालुक्यातील अणाव व वाडोस ग्रामपंचायतीनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. तसेच सर्वोत्कृष्ट डाटा ऑपरेटर म्हणून स्नेहा नागदे यांची निवड झाली होती. शासन दरबारी हा मिळालेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी गौरवास्पद होता. राज्यसरकारचे हे महाआवास योजनेचे दुसरे वर्ष असून सलग दुसऱ्या वर्षीही पुरस्कार मिळविण्यात कुडाळ पंचायत समितीने यशाचे सातत्य या निमित्ताने टिकवून ठेवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुक्यात कुडाळ तालुका पंचायत समिती राज्य शासन पुरस्कारासाठी नेहमीच कार्यरत होती. तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या साडे सहा वर्षाच्या कालावधीत त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे सातत्याने ही पंचायत समिती केवळ कोकणातच नव्हे तर राज्यपातळीवर नेहमीच अव्वल राहिली. श्री चव्हाण आणि त्यांच्या टीमने या योजनेच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात अनेक उपक्रम राबवले श्री चव्हाण यांनी सातत्य ठेवल्यामुळे 31 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्या कारकीर्दीत हा सलग दुसऱ्यांदा कुडाळ पंचायत समिती ही प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यस्तरावर प्रथम आणि राज्यशासनाच्या महाआवास योजनेत द्वितीय ठरली आहे हे विशेष म्हणावे लागेल.
या पुरस्कारप्रसंगी प्रधानमंत्री सचिव, एकनाथ डवले, ग्रामविकास, विभागीय आयुक्त नागपूर श्रीम विजया लक्ष्मी बिदरी, कोकण आयुक्त, महेंद्र कल्याणकर, राज्य संचालक राजाराम दिघे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रजित नायर, तत्कालीन प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, कुडाळचे तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण, राजू खेत्री, प्रमोद मुणगेकर, विलास गोसावी, सानिका चव्हाण, स्नेहा नागदे उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.