तुमचा कम्फर्ट झोन सोडून संशोधन करा” डॉ. अभिजित केळकर, अबुधाबी विद्यापीठ

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे पहिले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
21व्या शतकातील विविध विद्याशाखांमधील बदलांचा अभ्यास करण्याच्या आणि त्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील मराठी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि वाघमारे ब्रदर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तरीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
“21 व्या शतकातील साहित्य, मानव्य विद्याशाखा, शिक्षण, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कॉमर्स, व्यवस्थापन आणि कायदा यातील बदल आणि विकास” ही या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राची मध्यवर्ती संकल्पना होती. या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रामध्ये कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर यांनी कृ. सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतिहास आणि कार्याविषयी माहिती दिली आणि या पहिल्याच आंतर राष्ट्रीय चर्चासत्राच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी उपस्थितांना महाविद्यालयाच्या विविध विभागांची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील उच्च कामगिरीचा उल्लेख केला. या चर्चा सत्राच्या समन्वयक, डॉ उज्वला सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकात या परिषदेचा उद्देश आणि संकल्पना स्पष्ट केल्या. प्रा. बी. एच. चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. खोबरे यांनी उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन केले. डॉ. किशोर वाघमारे यांनी चर्चासत्रात सहभागी संशोधकांच्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आणि पब्लिकेशन व प्रेझेंटेशन साठी 118 हून अधिक शोध निबंध आले असल्याचा उल्लेख केला.
त्यानंतरच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ राजेंद्र कुंभार यांनी आधुनिक माहितीचे स्त्रोत आणि संशोधनाची गुणवत्ता या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी माहितीच्या स्त्रोतांमध्ये 21 व्या शतकात कसे बदल होते गेले, त्यांचा आढावा घेतला. गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी विविध माहितीचा शोध कसा घ्यावा, वाचन कसे असावे, संशोधन अहवाल, पुस्तके, जर्नल, रिसर्च पेपर यांचा संशोधनासाठी कसा वापर करावा, डाटा बेस चे महत्व आणि उपयोग, पेटंट फाईल करण्याचे महत्त्व आणि प्रक्रिया या मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण केले. डॉ. संकेत बेळेकर यांनी डॉ. कुंभार यांचा परिचय करून दिला व डॉ. एम. आर. खोत यांनी त्यांचे आभार मानले.
दुसऱ्या सत्रामध्ये लंडन विद्यापीठातील डॉ. जेनिस फर्नांडिस यांनी करिअर ओरिएंटेड संशोधन या विषयावर पॉवर पॉइंट सादरीकरणासह संबोधित केले. अत्यंत प्रभावी ठरलेल्या त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी प्रभावी शोध घेण्याच्या क्लृप्त्या, सायटेशन मधून शोध कसा घ्यावा, संशोधन साधनांचे मूल्यमापन कसे करावे, देशपातळीवर, विभाग पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी कोणते उपक्रम घेता येतील, इत्यादी विषयी माहिती दिली. त्याही पुढे इंग्लंड मध्ये उपलब्ध असलेल्या संशोधनाच्या करिअर संधी, त्या साठी आवश्यक असणारे घटक, संशोधन करिअरसाठी आवश्यक असणारी कौशल्ये, इत्यादी अनेक मुद्द्यांचा डॉ जेनिस यांनी परामर्श घेतला. ग्रंथपाल प्रा. संग्रामसिंह पवार यांनी डॉ. जेनिस यांचा परिचय करून दिला तर प्रा. नताशा कोचरेकर यांनी त्यांचे आभार मानले.
तिसऱ्या सत्रामध्ये फुजारिया विद्यापीठ, आणि अबुधाबी विद्यापीठ यु ए इ येथील डॉ अभिजित केळकर यांनी संशोधनातील नवप्रवाह आणि स्पर्धात्मक संशोधन या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सह आपले विचार मांडले. “कधीही संशोधन कशाची तरी पूर्तता करायची आहे म्हणून न करता, संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे समजून घेऊन संशोधन करा, आपल्या कंफर्ट झोन मधून बाहेर येऊन संशोधन करा” असे आवाहन त्यांनी सर्व सहभागी झालेल्या संशोधक, प्राध्यापक आणि प्रतिनिधींना केले. डॉ. केळकर यांचा परिचय डॉ. उर्मिला मेस्त्री यांनी करून दिला, तसेच डॉ. एच. एम. चौगले यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या सत्रात जगभरातील आणि देशातील विविध महाविद्यालयांच्या प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यानी आपले शोध निबंध सादर केले.
. या निमित्ताने विविध विद्याशाखेतील संशोधकांनी 21 व्या शतकात झालेले बदल उत्तमरीत्या नोंदवले, अश्या प्रकारचे उपक्रम या पुढे देखील घेतले जातील,असा उल्लेख करत, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी सर्वांचे आभार मानले. झूम ह्या डिजिटल व्यासपिठावरून ह्या चर्चासत्राचे संचलन डॉ. किशोर वाघमारे आणि डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. त्यासाठी वाघमारे ब्रदर्स ह्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सहाय्य लाभले.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कन्वेनर प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, डॉ. उज्वला सामंत, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. कैलास राबते, कु. शर्वरी केळुस्कर, डॉ. एच. एम. चौगले, डॉ. डी. व्ही. हारगिले, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. प्रमोद खरात, डॉ. संकेत बेळेकर यांनी परिश्रम घेतले. या परिषदेसाठी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर , सचिव चंद्रशेखर कुशे आणि इतर विश्वस्त सदस्यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
मालवण( प्रतिनिधी)